लाडक्या बाप्पाचे पूजासाहित्य महागले; मुंबईसह कोकणात जाणाऱ्या भक्तांची खरेदीसाठी उडाली झुंबड; कापूर, धूप, अगरबत्ती, कंठीच्या दरात झाली १० ते १५ टक्क्यांची वाढ 
मुंबई

लाडक्या बाप्पाचे पूजासाहित्य महागले; मुंबईसह कोकणात जाणाऱ्या भक्तांची खरेदीसाठी उडाली झुंबड; कापूर, धूप, अगरबत्ती, कंठीच्या दरात झाली १० ते १५ टक्क्यांची वाढ

महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे कापूर, धूप, अगरबत्ती, कंठी, हार यांच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिंदूंचे आराध्य दैवत म्हणून बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली जाते.

गिरीश चित्रे

मुंबई : महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे कापूर, धूप, अगरबत्ती, कंठी, हार यांच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिंदूंचे आराध्य दैवत म्हणून बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. त्यामुळे गणेशोत्सवात पूजेच्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली असली तरी मुंबईसह कोकणात गावाकडे जाणाऱ्या भक्तांची बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे.

लालबाग, परळ या भागात सणासुदीच्या काळात खरेदीसाठी लोक हमखास येतातच. त्यामुळे गणपतीत पूजेचे साहित्य महागले असले तरी खरेदीसाठी भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही, असे लालबाग येथील पूजासाहित्य विक्रेते मयुरेश खामकर यांनी सांगितले. लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असो वा घरगुती गणेशोत्सव, तो साजरा करण्यासाठी भक्तांची लगबग सुरु झाली आहे. तर दुसरीकडे कापूर, धूप, अगरबत्ती, कंठी, हार आदी बाप्पाच्या पुजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भक्तांची दादर, परळ, लालबाग भागात गर्दी होताना दिसत आहे. यंदा सर्वाधिक दरवाढ कापूर आणि धूप यांची झाली असून गेल्या वर्षी ८०० ते ९०० रुपये किलो दराने मिळणारा पारंपरिक कापूर यंदा १,००० ते १,४०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर विशेष मागणी असलेला भीमसेन कापूर १,००० ते १,१०० रुपयांवरून थेट १,६०० रुपये किलोपर्यंत वाढला आहे. कोविडनंतर भीमसेन कापूरचा वापर वाढल्याने त्याची मागणी आणि किंमत दोन्ही वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कच्च्या मालाच्या वाढलेल्या खर्चाचा परिणाम

धुपाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. पावडर, वाटाणा, ड्रॉप आणि सळी अशा विविध प्रकारच्या धुपाच्या दरात किलोमागे सुमारे २०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ६०० ते १,२०० रुपयांच्या दरम्यान मिळणारा धूप यंदा ८०० ते १,६०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. अगरबत्ती उत्पादक कंपन्यांनीही किमती वाढवल्या असून विविध प्रकारच्या अगरबत्त्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या खर्चामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. तसेच प्रसादासाठी लागणारे गूळ, साखर, फुटाणे, गुळाचे मोदक तसेच ड्रायफ्रूट्स यांच्याही किंमती वाढल्याने उत्सवाचा खर्च आणखी वाढला आहे. मात्र, महागाई असूनही गणेशभक्तांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झालेला नाही. बाप्पासाठी उत्तम दर्जाचे साहित्य खरेदी करण्याला भक्त प्राधान्य देत असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी कायम आहे.

महागाईचा फटका, पण उत्साह कायम

‘गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या जवळपास प्रत्येक साहित्याच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम बाजारावर होत आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय असल्याने महागाईकडे दुर्लक्ष करून लोक उत्साहाने खरेदी करत आहेत’, असे मयुरेश खामकर यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

डीजेचे स्तोम संपलेले दिसेल; मुख्यमंत्र्यांचा दावा, लवकरच सरकार घेणार निर्णय, 'कायद्याचा बडगा नको, लोकांना विश्वासात घ्यायला हवे'

मुंबईत ऑगस्टमध्ये ६६ टक्के कमी पाऊस; ३५ वर्षांतील नीचांक

Mumbai : ३० स्टॉल्सवर हातोडा; भायखळा, मुंबई सेंट्रलमध्ये 'पादचारी प्रथम'; नायर रुग्णालय मार्गावर २७ स्टॉल्सना नोटीस

कोयना धरण शंभर टक्के भरले; १०५.२५ टीएमसी पाणीसाठा

Mumbai : गोरेगावमध्ये खासगी बसला भीषण आग; वाहतूक ठप्प