मुंबई

कचरा पेटवणे ठरले तापदायक १० दिवसांत २२ तक्रारी; २,२०० रुपये दंड वसूल

प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेता बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : प्रदूषण नियंत्रणासाठी कचरा जाळण्यावर बंदी घालण्यात आली; मात्र नियमांना बगल देत कचरा पेटवणे चांगलेच महागात पडले आहे. कचरा पेटवणाऱ्याविरोधात कारवाई बडगा उगारण्यात येत असून, १ ते १० नोव्हेंबरपर्यंत २२ जणांविरोधात कारवाई करत २,२०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोणी कचरा जाळताना आढळल्यास फोटो काढत त्याची तक्रार “मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन ८१६९६-८१६९७” या क्रमांकावर करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेता बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली आहे. बांधकाम ठिकाणाहून धुळीचे कण पसरु नये यासाठी ३५ फूट उंच भिंत बांधणे, स्प्रिकलर बसवणे धुळीचे कण पसरु नये यासाठी पडदे लावणे, अशा प्रकारचे २७ नियम आखून देण्यात आले आहेत. तसेच कचरा, शेकोटी पेटवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी वेळोवेळी दिलेले निर्देश तसेच अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये परिणामकारक अशी विविध कामे होत आहेत. उपाययोजना पलीकडे जावून वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवरही सक्त कारवाई केली जात आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेची अॅक्शन

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण, व वातावरणीय बदल विभाग यांच्या मार्फत २६ ऑक्टोबर २०२३ रोजी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी राबवायची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यातील अनुक्रमांक ९ मधील निर्देशांचे अनुपालन करण्याच्या उद्देशाने, महानगरपालिकेच्या मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई या ८१६९६-८१६९७ व्हॉट्सअॅप नंबर वर तक्रार करा, असे आवाहन केले आहे. ८१६९६-८१६९७ या व्हॉट्सॲप सेवा क्रमांकावरील तक्रार सादरीकरणाच्या टॅब मध्ये “कचरा जाळणे” हा विकल्प अद्ययावत करण्यात आला आहे.

कचरा जाळणाऱ्यांचा फोटो काढा

मुंबई व परिसरात वायू प्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. कचरा जाळताना कोणी आढळल्यास त्याची तक्रार मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन ८१६९६-८१६९७ या व्हॉट्सॲप सेवा क्रमांकावर नोंदवावी. तसेच छायाचित्र जोडावे, असे आवाहनही घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त जाधव यांनी केले आहे.

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

मुंबईतील बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण करा! अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

हरयाणा, गोवा, लडाखला मिळाले नवे राज्यपाल

बोइंगच्या विमानांचे ‘फ्यूएल स्वीच’ तपासा; DGCA चे आदेश