मुंबई : मराठीचा झेंडा आता इंग्लंडमध्येही फडकणार असून लंडनमध्ये ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्यात येणार आहे. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
मुंबईतील मराठी भाषा भवनाचे काम वेगाने सुरू असून, डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच, ऐरोली येथे ३४ कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी नमूद केले.
विधान परिषदेत नियम ९२ अन्वये झालेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मराठीचा डंका जागतिक स्तरावर गाजवण्यासाठी लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी भाषा केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी रुपये खर्चून ‘महाराष्ट्र मंडळाची’ ऐतिहासिक इमारत खरेदी केली असून, पुढील दोन महिन्यांत हे केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होईल, असे मंत्री सामंत यांनी दिली. याशिवाय, जागतिक स्तरावर मराठीचा प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्यात येणार असून, त्यापैकी ३९ मंच आधीच कार्यरत झाले आहेत, असे ते म्हणाले. या चर्चेत सदस्य श्रीमती उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे आणि मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला होता.
केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्यात विश्व मराठी संमेलनासह वारकरी, बाल, युवा, महिला आणि कामगार साहित्य संमेलनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचे साहित्य इतर भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी 'स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अनुवाद समिती' पुन्हा सुरू करण्यात येत आहे, असे सांगून ते म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात 'जिल्हा भाषा अधिकारी' हे स्वतंत्र पद निर्माण केले जाईल. पुढील एका महिन्याच्या आत ही नियुक्ती केली जाईल.
ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त ‘मराठी भाषा विकास केंद्र’
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठी पावले उचलली जात आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी येथे ‘मराठी भाषा विकास केंद्र’ सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, भाषाविषयक कामांना गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ‘जिल्हा भाषा अधिकारी’ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी आगामी एका महिन्यात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.