मुंबई

मुसळधार पावसाने रस्तेवाहतूक कोलमडली,पुढील तीन दिवस धोक्याचे

अनेक मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

प्रतिनिधी

मुंबईत सरासरी २,२०० मिमी पाऊस होतो; परंतु २९ जून ते आतापर्यंत १,१५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचे कुलाबा हवामान विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मंगळवारी संध्याकाळी बरसणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळपासून दमदार इनिंग सुरू केली. मुंबईत कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक सखलभागात पाणी साचले असून त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे.

अनेक मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अंधेरी, कुर्ला, देवनार, वांद्रे-कुर्ला संकुल, खार, पेडर रोड आदी परिसरात वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. याशिवाय माटुंगा व पेडर रोड, सात रस्ता या तीन ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आली होती. अंधेरी सब-वे येथे तीन फूट पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक एस. व्ही. रोड व डी. एन. नगर येथून वळविण्यात आली होती.

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाणी उपसा करणारे पंप कार्यान्वित करून सखलभागात साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा केल्यामुळे खोळंबलेली वाहतूक काही वेळाने पुन्हा सुरू करण्यात आली. याशिवाय कुर्ला कमानी जंक्शन, काजूपाडा व सोनापूर जंक्शन येथे दोन फूट पाणी साचले होते; पण तेथील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली; पण वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. बीकेसी येथील कॅपिटल इमारत परिसरात झाड कोसळल्यामुळे दोन्ही मार्गिकेवरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे वाहतूक जे. बी. मार्गावरून वळविण्यात आली.

खार रेल्वे स्थानकाजवळही अर्धा फूट पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. याशिवाय मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील सर्व्हिस रोडवरही एक फूट पाणी साचले होते. पंपाच्या सहाय्याने तेथील पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. पेडर रोड येथे बेस्ट बस बंद पडल्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच महालक्ष्मी मंदिर मार्गावरही पाणी साचले होते; पण सकाळी ११ नंतर तेथील वाहतूकही पूर्वपदावर आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत