मुंबई

मालमत्तेचे नुकसान करणारा महाराष्ट्र सैनिक कसा?

नवशक्ती Web Desk

मुंबई: दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला तर विध्वंस होतो. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरू आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्रविरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे. जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की, कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो. तो कसा काय महाराष्ट्र सैनिक असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनकर्त्या मनसैनिकांना केला आहे. याबाबतचे खुले पत्र त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे गेल्या १७ वर्षांपासून काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत १५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच मागील १० वर्षांत या महामार्गावर अपघातात अडीच हजार नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ४ वर्षांत तयार होतो, मग मुंबई-गोवा महामार्ग का होत नाही, असा सवाल करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना कोकणात या महामार्गावर ठिकठिकाणी आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सैनिकांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. यात काही ठेकेदारांच्या वाहनांचे तसेच सरकारी मालमत्तांचे नुकसान झाल्याने कंत्राटदारांनी सरकारकडे सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील जनतेसाठी खुले पत्र लिहून मनसेवर टीकास्त्र सोडले आहे.

आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो, पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी आपण हीच आहे. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचे कारण समजण्यापलीकडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरली आहे. दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको, आता त्याऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील काम करणारी तरुणाईची साथ हवी आहे. काश्मीरमधील दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्यानंतर तेथील अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली, त्याचप्रमाणे ही तोडफोडप्रेमी मंडळी कोकणच्या विकासाची विचारसरणी पसंत करतील, अशी आशा आहे, असे पत्राच्या शेवटी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन सुरू

रवींद्र चव्हाण या पत्रात म्हणतात, मुंबई-गोवा महामार्ग आता खरोखरीच दृष्टिपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल, याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग जनतेच्या सेवेसाठी तयार होईल, हा शब्द देतो. कोकणचा सुपुत्र म्हणून तेथील समस्या जवळून बघितल्या होत्या. यातील अनेक समस्यांचे मूळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण हेच आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस