मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला भारत सोडण्याची (लीव्ह इंडिया) नोटीस बजावली आहे. या नोटीशीनुसार इम्रानला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इम्रान हा अमेरिकन नागरिक असून, भारतीय नागरिक नसतानाही राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
आंदोलनात सहभागी इम्रान पोलिसांच्या ताब्यात
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही अनेक आंदोलक तिथे जमले होते. अभिनेता इम्रान खानही या आंदोलनात सहभागी झाला होता. त्यावेळी पोलिसांनी इम्रानसह त्याची जोडीदार लेखा वॉशिंग्टन आणि बहीण झेन मेरी यांनाही ताब्यात घेतलं होतं.
पोलिसांच्या गाडीतून शेअर केला होता फोटो
आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्यानंतर इम्रानने पोलिसांच्या गाडीत बसलेला स्वतःचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यासोबत त्याने "बहुतेक मी फिरायला चाललो आहे" (Apparently I’m going for a drive), अशी मिश्कील कमेंटही केली होती.
एका व्हायरल व्हिडीओमध्ये इम्रान पोलिसांना 'जय हिंद' म्हणताना दिसला. आपल्याला नेमकं का ताब्यात घेण्यात आलं, हे माहीत नसल्याचंही त्याने सांगितलं होतं. पोलिसांनी जवळपास दोन तास गाडीत फिरवल्यानंतर सोडल्याचा दावा त्याने केला होता.
इम्रानकडे अमेरिकेचं नागरिकत्व
इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक असून, त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड आहे. या कार्डामुळे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना भारतात राहण्याची आणि काम करण्याची सुविधा मिळते. मात्र, त्यांना भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व राजकीय अधिकार मिळत नाहीत. भारतीय नागरिक नसतानाही इम्रानने आंदोलनात सहभाग घेतल्याने इमिग्रेशनविषयक कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.
२८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश
या आंदोलनाप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात इम्रानसह इतरांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इम्रानच्या आंदोलनातील सहभागावर आक्षेप घेत त्याला भारतातून बाहेर पाठवण्याची मागणी केली होती.