रेल्वे रूळ ओलांडत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील काही वर्षांत वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका असताना यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही घडतात. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे पोलीस सुरक्षेसोबत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मागील पाच वर्षांत उपनगरीय मार्गांवर जवळपास ६८ पादचारी पूल उभारले आहेत. हे पूल एमयूटीपी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आले असून, यामुळे अपघात संख्या निम्म्यावर आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘रेल्वे रूळ ओलांडू नका’ असे आवाहन वारंवार रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते; मात्र तरीही उपनगरीय रेल्वे मार्गांवरील बहुतांश रेल्वे स्थानकात रूळ ओलांडून प्रवासी ये-जा करतात. प्रशासनाने याबाबत अनेकदा कारवाईचा बडगा उगारला; परंतु पादचारी पुलांची संख्या कमी असल्याने गर्दी टाळण्यासाठी आम्ही रेल्वे रूळ ओलांडत प्रवास करत असल्याचे उत्तर काही प्रवाशांकडून देण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उपनगरीय रेल्वे मार्गांवर एमयूटीपी प्रकल्पाअंतर्गत जवळपास ६८ पादचारी पुलांची उभारणी केली आहे. त्यातील काही पादचारी पूल हे दोन स्थानकांदरम्यानचे असल्याने रेल्वे क्रॉसिंग टाळले जाऊन हजारो प्रवाशांचे प्राण वाचत आहेत. दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आणखी १७ पादचारी पुलांची उभारणी करण्याचे काम सुरू असल्याचे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.