अभिषेक पाठक
मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी भारताची पहिली स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन बेंगळुरू येथील बीईएमएल कारखान्यात विकसित केली जात आहे. प्रवासी सुख-सोयी, सुलभता आणि ऊर्जा बचत यावर या प्रकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. या ट्रेनचा चाचणी वेग ताशी २८० किमी आणि प्रत्यक्ष चालवण्याचा वेग ताशी २४९ किमी असणार असून यात सुमारे ५५७ प्रवाशांच्या बसण्याची क्षमता असेल. भारतीय प्रवाशांच्या गरजेनुसार डिझाईन केलेल्या या ट्रेनमध्ये सात स्टँडर्ड-क्लास आणि एक एक्झिक्युटिव्ह-क्लास डबा असणार आहे तसेच अपंग प्रवाशांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध असतील.
ही ट्रेन सुमारे २०२ मीटर लांब असून त्यात चार मोटार कार आणि चार ट्रेलर कारचा समावेश असेल. स्टँडर्ड-क्लास डब्यांमध्ये ३+३ अशी बसण्याची व्यवस्था असेल तर एक्झिक्युटिव्ह-क्लास डब्यांमध्ये २+२ अशी रचना असेल. या डिझाइनमध्ये आरामदायी सीट्स, पुरेशी लेगस्पेस, मोठ्या खिडक्या, ओव्हरहेड सामान ठेवण्याची जागा आणि मोठ्या सामानासाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. प्रत्येक सीटजवळ मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध असतील. प्रवासादरम्यान वाय-फाय आधारित मनोरंजन अनुभवता येईल. याशिवाय डब्यांमध्ये आधुनिक बायो-डायजेस्टर टॉयलेट्स व जाण्या-येण्यासाठी जोडणाऱ्या पॅसेजची सोय असेल.
दिव्यांगांची सुलभता, आरामावर भर
ट्रेनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग प्रवाशांच्या सुविधेसाठी केलेली विशेष रचना. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनचा मजला एकाच पातळीवर असेल, ज्यामुळे गाडीत चढणे आणि उतरणे सोपे होईल. व्हीलचेअरसाठी जागा, सुलभ शौचालये आणि ब्रेल लिपीतील फलकदेखील दिले जातील. ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतर कमी करण्यासाठी दारांजवळ विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विविध भाषांमध्ये माहिती
एलसीडी स्क्रीनवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये माहिती दर्शवली जाईल तर ऑडिओ सिस्टीमद्वारे घोषणा केल्या जातील. आणीबाणीवेळी प्रवाशांना ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधता येईल. प्रत्येक डब्यामध्ये दोन हिटिंग, एचव्हीएसी युनिट्स तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवतील.
वेग, भविष्यातील विस्तारासाठी रचना
ही ट्रेन २५ केव्ही, ५० हट्सझ वीजपुरवठा प्रणालीवर चालेल आणि यात 'रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग' तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जे ब्रेकिंग दरम्यान ऊर्जा पुनर्प्राप्त करून पुन्हा सिस्टीममध्ये पाठवू शकते. तिच्या एरोडायनामिक डिझाइनमुळे बोगद्यांमध्ये जिथे हवेच्या दाबातील बदल आणि आवाजाचा प्रवाशांवर परिणाम होऊ शकतो.
भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन
चाचणी वेग : ताशी २८० किमी
प्रत्यक्ष वेग : ताशी २४९ किमी
प्रवासी क्षमता : ५५७
ट्रेनची लांबी : २०२ मीटर
डबे : ८
डब्यांचे स्वरूप : ७ स्टँडर्ड-क्लास आणि १ एक्झिक्युटिव्ह- क्लास डबा
रचना : ४ मोटार कार आणि ४ ट्रेलर कार
प्रवासी सुविधा : वाय-फाय मनोरंजन, चार्जिंग पॉईंट्स, सुलभ टॉयलेट्स, व्हीलचेअर स्पेस, ब्रेल लिपी, बहुभाषिक घोषणा आणि प्रति डबा दोन एचव्हीएसी युनिट्स.
तंत्रज्ञान : रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग, एरोडायनामिक डिझाइन, कमी आवाज आणि भविष्यात दोन ट्रेन जोडून १६ डब्यांची ट्रेन बनवण्याची सुविधा.