मुंबई : अमेरिकन नागरिकत्व असलेले मूल दत्तक घेणे हा कोणत्याही भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना भारतीय दाम्पत्याला अमेरिकन कायदे आणि प्रक्रियेनुसार अमेरिकेतून मूल दत्तक घेण्यासाठी सर्व आवश्यक औपचारिक बाबींची पूर्तता करावीच लागेल, असे स्पष्ट केले आणि भारतीय दाम्पत्याची याचिका फेटाळली.
भारतीय दाम्पत्याने अमेरिकन नागरिकत्व असलेल्या आपल्या नातेवाईकाचे मूल दत्त घेण्यासंबंधी निर्देश देण्याची मागणी करीत न्यायालयाचे दार ठोठावले होते. खंडपीठाने त्यांच्या विनंतीला अनुसरून निर्देश देण्यास स्पष्ट नकार देत भारतीय दाम्पत्याची याचिका फेटाळली.
बाल न्याय कायदा किंवा दत्तक नियमांमध्ये परदेशी नागरिकत्वाच्या मुलाला नातेवाईकांमध्येही दत्तक देण्याची तरतूद नाही, असे नमूद करीत खंडपीठाने यासंदर्भात आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर करण्यास नकार दिला.
दत्तक नियम काय सांगतो?
या प्रकरणातील मूल बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा तसेच दत्तक नियमांच्या तरतुदींनुसार ‘काळजी व संरक्षणाची गरज असलेले मूल’ वा ‘कायद्याच्या संघर्षात असलेले मूल’ यापैकी कोणत्याही व्याख्येत मोडत नाही, असे न्यायालयाने म्हटले.