Mumbai : समुद्रकिनारे कचऱ्याच्या विळख्यात; पालिकेने श्वेतपत्रिका जाहीर करावी - किशोरी पेडणेकर 
मुंबई

Mumbai : समुद्रकिनारे कचऱ्याच्या विळख्यात; पालिकेने श्वेतपत्रिका जाहीर करावी - किशोरी पेडणेकर

नाल्यांतील कचरा वेळेत उपसला जात नसल्याने तो थेट समुद्रात वाहून जात आहे. यामुळे निळाशार समुद्र अक्षरशः काळवंडून गेला आहे. समुद्रकिनाऱ्यावर ठिकठिकाणी तब्बल तीन-तीन फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत.

Swapnil S

मुंबई : नाल्यांतील कचरा वेळेत उपसला जात नसल्याने तो थेट समुद्रात वाहून जात आहे. यामुळे निळाशार समुद्र अक्षरशः काळवंडून गेला आहे. समुद्रकिनाऱ्यावर ठिकठिकाणी तब्बल तीन-तीन फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि शहराच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेशी संबंधित या गंभीर प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून पालिकेने तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्‍या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

स्वच्छतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांचे आज विदारक चित्र आहे. शहरभर साचलेला कचरा, वेळेत साफ न झालेले नाले आणि प्रदूषित समुद्रकिनारे हे महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय, ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचे जिवंत पुरावे आहेत. ही केवळ स्वच्छतेची समस्या नसून, मुंबई महापालिकेच्या अपयशी व्यवस्थापनाची उघड झालेली लक्‍तरे आहेत.

विरोधी पक्षनेत्‍या किशोरी किशोर पेडणेकर यांनी बुधवारी जुहू समुद्र किनाऱ्याला आकस्मिक भेट दिली. तसेच, समुद्र किनाऱ्याच्‍या स्‍वच्‍छतेची पाहणी केली. मुंबईकरांना स्वच्छ, निरोगी आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळावे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रितपणे काम करण्‍याची गरज आहे. मुंबईत देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. समुद्रकिनारे आणि महानगरातील अस्वच्छता पाहून त्यांच्या मनात मुंबईबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात. ही केवळ मुंबईची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी आहे. त्यामुळे आरोपांपेक्षा कृतीला प्राधान्य देत, मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असा सल्ला पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

सभागृहात सत्ताधारी भाजप मोठमोठ्या घोषणा करतात, जणू शिक्षकाप्रमाणे धडे देतात. पण केवळ उपदेश करून चालणार नाही; प्रत्यक्ष कामावर कठोर नियंत्रण ठेवणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारणेही तितकेच आवश्यक आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी समाज माध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर समुद्र किनाऱ्यावरील भयावह दृश्य पाहत होते. म्हणूनच आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. तिथे जे चित्र दिसले, ते अत्यंत धक्कादायक होते. नाल्यांतील कचरा वेळेत साफ न झाल्यामुळे तो थेट समुद्रात जाऊन मिळत आहे. निळाशार समुद्र अक्षरशः काळवंडून गेला आहे. ठिकठिकाणी तब्बल तीन फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे थर साचलेले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

कर्मचारी आहेत कुठे?

जुहू समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी दररोज सकाळी ७५ आणि संध्याकाळी ७५ कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे १५ कर्मचारीसुद्धा दिसत नव्हते. मग उर्वरित कर्मचारी कुठे आहेत?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बोरघाटातील दुसरी लाईन दुरुस्त; आजपासून डेक्कन क्वीन, इंटरसिटी धावणार

उंच पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन नको! परवानगी न देण्यासाठी हायकोर्टाला साकडे

नवी मुंबई जागतिक हवाई नकाशावर; अबूधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानाचे ऐतिहासिक आगमन

जन्मदाखल्यात बदल करण्याचा पालिकेला अधिकार; विश्वासार्ह पुराव्यांची आवश्यकता - हायकोर्ट

थकीत वीजबिले माफ; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, दिवसा मिळणार १२ तास मोफत वीज