आशिष शेलार, असिफ झकेरिया 
मुंबई

शेलार यांची हॅटट्रिक की काँग्रेसचे पुनरागमन? वांद्रे पश्चिमेत महायुती आणि मविआ यांच्यात थेट लढत

काँग्रेसने २००९ मध्ये निसटत्या बहुमताने जिंकलेला वांद्रे-पश्चिम विधानसभा मतदारसंघ त्यानंतर सलग दोन वेळा भाजपचे आशिष शेलार यांनी मोठ्या मजबुतीने काबीज केला. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा शेलार हेच भाजपचे उमेदवार असून ते विजयाची हॅटट्रिक साधणार, की काँग्रेस पुन्हा या जागेवर आपला झेंडा फडकवणार, याची उत्सुकता आहे.

Swapnil S

शिरीष पवार/ मुंबई

काँग्रेसने २००९ मध्ये निसटत्या बहुमताने जिंकलेला वांद्रे-पश्चिम विधानसभा मतदारसंघ त्यानंतर सलग दोन वेळा भाजपचे आशिष शेलार यांनी मोठ्या मजबुतीने काबीज केला. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा शेलार हेच भाजपचे उमेदवार असून ते विजयाची हॅटट्रिक साधणार, की काँग्रेस पुन्हा या जागेवर आपला झेंडा फडकवणार, याची उत्सुकता आहे.

यावेळी वांद्रे पश्चिमेतून महायुतीकडून भाजपचे आशिष बाबाजी शेलार, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे असिफ अहमद झकेरिया यांच्यासह बसप, राष्ट्रीय उलेमा कौन्सिल, बहुजन महा पार्टी, आझाद समाज पार्टी- कांशीराम, पीस पार्टी आदी लहान मोठ्या पक्षांसह अपक्ष असे मिळून एकूण बारा उमेदवार रिंगणात असले तरी, प्रमुख लढत ही भाजपचे शेलार आणि काँग्रेसचे झकेरिया यांच्यात आहे.

२००८ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या वांद्रे पश्चिमेतून २००९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी (५९,६५९) यांनी भाजपचे आशिष शेलार (५७,९६८) यांचा अवघ्या १,६९१ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी अपक्ष रहमान सिराज खान यांनी चार टक्के म्हणजे ५,१३२ मते घेतली होती. २०१४ मध्ये मात्र भाजपचे आशिष शेलार यांनी तब्बल २६,९११ इतक्या मताधिक्याने काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांना पराभूत केले होते. त्यावेळी सिद्दीकी यांच्या मतांच्या टक्केवारीत १३.९१ टक्के घट झाली होती, तर शेलार यांनी झालेल्या मतदानाच्या ५०.९३ टक्के मते मिळवून आपली मतांची टक्केवारी ५.७३ टक्क्यांनी वाढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे विलास चावरी यांना येथे १४,१५६ (९.६४ टक्के टक्के) मते मिळाली होती.

२०१९मध्ये पुन्हा भाजपकडून लढलेल्या आशिष शेलार यांनी या जागेवर एकूण मतदानाच्या ५७.११ टक्के (७४,८१६) मते मिळवून २६,५०७ इतक्या मताधिक्याने ही जागा कायम राखली होती. त्यावेळी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे असिफ झकेरिया यांना ४८,३०९ इतकी मते पडली होती. त्यावेळी सुद्धा भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ६.१८ टक्के वाढ, तर काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत ४.५८ टक्के वाढ झाली होती.

शिवसेनेची साथ नसताना २०१४ मध्ये आणि शिवसेनेसोबत युती असताना २०१९ मध्ये सुद्धा भाजपचे शेलार यांनी या जागेवर ७४ हजारांहून अधिक मते घेतलेली आहेत. सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या शेलार यांना यावेळी प्रस्थापितविरोधी भावनेचा फटका बसू शकेल का, तसेच काँग्रेसचा उमेदवार आणि मित्रपक्ष त्यांच्या मतांची गोळाबेरीज भाजपच्या मतांच्या तुलनेत कितपत वाढवू शकतात, याचे उत्तर मतमोजणीतूनच मिळणार आहे.

वांद्रे पश्चिम हा एकीकडे टोलेजंग टॉवर आणि दुसरीकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडपट्ट्या असलेला मतदारसंघ आहे. इथे मुस्लिम मतदार २५ टक्के तर ख्रिस्ती मतदार आठ टक्क्यांच्या आसपास आहेत. गुजराती, उत्तर भारतीय, मराठी अशी संमिश्र बहुभाषिक वस्ती असलेला हा भाग आहे. झोपडपट्टी भागात प्रलंबित असलेले पुनर्वसन प्रकल्प हा प्रमुख मुद्दा आहे. अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आहे. वसाहतींमध्ये मोठ्या संख्येने उघडण्यात आलेले रेस्टॉरंट, पब यांच्यामुळे होणारा उपद्रव, रात्रीच्या वेळी शांततेचा होणारा भंग, रस्त्यांवरील वाहतूककोंडी, अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे, फेरीवाले या नागरिकांना भेडसावणाऱ्या मुख्य समस्या आहेत. मेट्रो प्रकल्पाची कामे तसेच पुनर्विकास प्रकल्पांच्या कामामुळे हवेचे प्रदूषण हा एक मुद्दा आहे.

आशिष शेलार यांच्या प्रचारात मतदार संघातील पायाभूत तसेच नागरी सुविधांच्या दर्जोन्नतीवर भर दिला जात आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचे काही प्रकल्प सुरू असून आणखी दोन-चार प्रकल्पांच्या कामांचे नारळ वाढविले आहेत. पुनर्वसन मार्गी लागल्यानंतर येथील बकालपणा नष्ट होऊन मालमत्तांच्या किमती बऱ्याचशा वाढतील, असा त्यांचा दावा आहे. रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, किनाऱ्यांचे सुशोभीकरण, उद्याने, खेळाची मैदाने अशी कामे आपण करीत आहोत. प्रमुख रस्त्यांवरीलच नव्हे तर गल्लीबोळातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते प्रकल्पांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत, असा त्यांचा दावा आहे. याउलट तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या झकेरिया यांच्या मते, सुशोभीकरणासारख्या कामावर निधी वाया घालवला जात असून भाजपच्या आमदाराने येथील कोणतेही प्रश्न सोडवलेले नाहीत.

प्रमुख समस्या

-वाहतूककोंडी

-मोठ्या संख्येने असलेल्या रेस्टॉरंट, पबमुळे होणारा उपद्रव

-बेकायदा फेरीवाले, अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे

-पाणीटंचाई

-रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प

-वांद्रे भाभा रुग्णालयाची दुरवस्था.

मतदार

-पुरुष : १ लाख ४९ हजार ८६९

-महिला : १ लाख ३८ हजार ९६७

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी