मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रांत पाऊसधारा कोसळत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून गेल्या २४ तासांत ३.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एका दिवसात धरणातील पाणीसाठा १६.९२ टक्क्यांवर पोहोचला असून ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
मुंबई व परिसरात गेल्या सात दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यासह मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. जून महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उणीव भरून काढली आहे.
मुंबई व परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकर सुखावला असून आता मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाने बॅटिंगला सुरुवात केली आहे. मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते.
सध्या सातही धरणांत ६ जुलै रोजी २ लाख ४४ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहिली तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल आणि मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
६ जुलै रोजी पाणीसाठा (टक्के)
अप्पर वैतरणा - ४.९९
मोडकसागर - ३०.९६
तानसा १७.३४
मध्य वैतरणा - १८.३५
भातसा - १४.१२
विहार - ९०.६१
तुळशी - ८२.१४
धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)
अप्पर वैतरणा - ४०.०० मिमी
मोडकसागर - १०१.० मिमी
तानसा - १४२.० मिमी
मध्य वैतरणा - ८७.० मिमी
भातसा - १६५.० मिमी
विहार - २१३.० मिमी
तुळशी - २८७.० मिमी