मुंबई : मुंबई आणि कोकण विभागातील अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर स्वरूपाचे स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे उल्लंघन आढळून आल्यानंतर, लोकप्रिय रेस्टॉरंट साखळी ‘भगत ताराचंद’ आणि कॉफी साखळी ‘बॅरिस्टा’सह एकूण सहा रेस्टॉरंटचे परवाने/नोंदणी रद्द करण्यात आले आहेत.
पनवेल येथील ‘चावला एंटरप्रायजेस’ (भगत ताराचंद) मध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांना स्वयंपाक घरामध्ये, साठवणूक कक्षामध्ये आणि संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळली. त्याच वातावरणात अन्नपदार्थांची साठवणूक व विक्री केली जात होती. कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे नव्हती तसेच एप्रन आणि हँडग्लोज यांसारख्या मूलभूत स्वच्छताविषयक वस्तूही नव्हत्या.
शिवाजी पार्क येथील ‘बॅरिस्टा कॉफी कंपनी लिमिटेड’मध्ये निरीक्षकांना गंजलेले, खराब झालेले आणि अस्वच्छ रेफ्रिजरेटर आढळले, तसेच त्यात योग्य तापमान राखले जात नव्हते. आईस्क्रीम, चिरलेल्या भाज्या आणि इतर अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले होते, तर शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांचे योग्य वर्गीकरण करण्यात आले नव्हते. दरम्यान, मढ आयलंड येथील ‘सँडी दा ढाबा’ अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत आढळला असून, त्याच्या परिसरात उंदीर आणि माशा असल्याचे निदर्शनास आले. येथील तीन फ्रीझर अत्यंत मळके होते आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये चिकनची अयोग्य पद्धतीने साठवणूक केली गेली होती. या आस्थापनात शाकाहारी व मांसाहारी अन्न तयार करण्याच्या जागांचे योग्य वर्गीकरण केलेले नव्हते, तसेच परिसरात अंडी आणि कचऱ्याचे अवशेष साचले होते.
तसेच, भांडूप येथील ‘राजिदी रिटेल प्रा. लि.’मध्ये एका मळलेल्या डीप फ्रीझरच्या आत मृत माशा आढळल्या, तर अन्नपदार्थांची पाकिटे जमिनीवर पडलेली होती. अधिकाऱ्यांना तिथे कीटकांचा प्रादुर्भाव, मोठ्या प्रमाणावर धूळ व मळकटपणा, फुटलेल्या लाद्या आढळल्या.