Mumbai : अखेर वसई-विरारचा मेट्रो मार्ग झाला मोकळा; MMRDA च्या आयुक्तांकडून प्रकल्प अहवाल सादर (संग्रहित छायाचित्र FPJ)
मुंबई

Mumbai : अखेर वसई-विरारचा मेट्रो मार्ग झाला मोकळा; MMRDA च्या आयुक्तांकडून प्रकल्प अहवाल सादर

वसई-विरार शहरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वसई-विरारपर्यंत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

Swapnil S

वसई : वसई-विरार शहरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वसई-विरारपर्यंत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आयुक्त संजय मुखर्जी यांनी मेट्रो मार्ग १३ चा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि मंत्रिमंडळाची टिप्पणी राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवली आहे. त्यामुळे येत्या काळात वसई ते मुंबई प्रवास अधिक वेगवान होणार असून वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन या सल्लागार संस्थेने मेट्रो मार्ग १३ (मीरा-भाईंदर ते वसई-विरार) चा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला आहे. या अहवालाला प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची मान्यता घेण्यासही हिरवा कंदील देण्यात आला आहे.

असा आहे प्रकल्प

या प्रकल्पाची एकूण लांबी २५.०३ किमी असून त्यापैकी ३.२५ किमी भुयारी आणि २१.७८ किमी उन्नत मार्ग असणार आहे. या मार्गावर १६ स्थानके प्रस्तावित असून, दुरुस्ती व देखभालीसाठी चिखलडोंगरी-विरार येथे आगार उभारण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग १३ हा मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा-भाईंदर) शी थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे हा मार्ग मेट्रो मार्ग ९, ७ आणि ७-अ यांच्याशी जोडला जाईल. तसेच वसई खाडीवरून मेट्रो आणि सहापदरी रस्त्याचा एकत्रित पूल उभारण्याचेही नियोजन आहे. या मेट्रो मार्गामुळे वसई-विरार परिसरातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अंधेरीकडे जाणे अधिक सोयीचे होणार आहे. यामुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडी, अपघात, ध्वनी आणि हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

या प्रकल्पाची अंदाजित किंमत १७,७२४.९९ कोटी

वसई-विरारमध्ये मेट्रो यावी, यासाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एमएमआरडीएने ३५०.९६ किमी लांबीच्या १४ मेट्रो मार्गांचा बृहत आराखडा तयार केला आहे. त्यापैकी काही मार्ग प्रवाशांसाठी खुले झाले असून उर्वरित मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पर्यायी वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मेट्रोसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश आल्याने प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार असून वेळ व इंधनाची बचत होईल. हा निर्णय स्वागतार्ह आहे.
नारायण मानकर, माजी महापौर, वसई-विरार

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया