मुंबई : दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण दरम्यान कोणताही मेगा ब्लॉक राहणार नाही.
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील वाहतूक सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ वाजल्यापासून ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/ बेलापूर/ पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या, पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी १०.१७ वाजल्यापासून ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.
सकाळी १० पासून ते सायंकाळी ६ पर्यंत हार्बर मार्गावर प्रवाशांना ठाणे - वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक कालावधीत बोरिवली-राम मंदिर स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गांवर तसेच राम मंदिर-कांदिवली स्थानकांदरम्यानच्या पाचव्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सर्व अप फास्ट मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप स्लो/सहाव्या मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे, सर्व पाचव्या मार्गावरील गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर धावतील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील आणि हार्बर मार्गावर अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.