मुंबई : केवळ संशयावरून गुन्हा सिद्ध होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने विवाहितेच्या छळाच्या प्रकरणात पतीसह सासरच्या चौघांची निर्दोष मुक्तता केली. हुंड्यासाठी छळ आणि दिराकडून झालेला बलात्कार अशा गंभीर आरोपांतून न्यायालयाने एकाच कुटुंबातील चार सदस्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. विशेष न्यायाधीश श्रुती शर्मा यांनी हा निकाल दिला. मुख्य साक्षीदार पीडित महिलेनेच न्यायालयात आपल्या जबाबावरून पूर्णपणे घुमजाव केल्याने सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता आला नाही.
पिडीत महिलेचा विवाह २८ जानेवारी २०१४ रोजी राजेश गुप्ता याच्याशी झाला होता. विवाहानंतर हुंड्यासाठी आणि मुलगी झाली या कारणावरून पती राजेश, सासू उर्मिला गुप्ता, दीर गणेश गुप्ता आणि नणंद सुशीला गुप्ता यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तसेच दीर गणेश याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर न्यायाधीश श्रुती शर्मा यांनी कायद्याच्या सिद्धांतांवर निरीक्षणे नोंदवत निकाल दिला. केवळ संशयाच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
पीडित महिलेने साक्ष फिरवली
ज्या पीडित महिलेच्या साक्षीवर हा संपूर्ण खटला आधारलेला होता, तिनेच आपल्या मुख्य साक्षीतून सासरच्या लोकांविरुद्धचे सर्व आरोप नाकारले. तसेच पोलिसांनी नोंदवलेल्या मूळ एफआयआरमधील मजकुरावरही तिने काहीच माहिती नसल्याचा जबाब न्यायालयापुढे दिला. त्याची नोंद करत न्यायालयाने विवाहितेचा पती राजेश गुप्ता, सासू उर्मिला गुप्ता, दिर गणेश गुप्ता आणि नणंद सुशीला गुप्ता या चौघांची निर्दोष मुक्तता केली.