मुंबई

म्हाडा कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरांची लॉटरी जाहीर; ३ सप्टेंबरला संगणकीय लॉटरी, ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध

म्हाडाचा विभागीय घटक कोकण मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार २८५ घरे व ७७ भूखंड विक्रीकरिता लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक कोकण मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार २८५ घरे व ७७ भूखंड विक्रीकरिता लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी १३ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय लॉटरी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे.

या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत सोमवार १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीत या योजनेंतर्गत १६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्यास सदनिका) ४१ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या लॉटरीसाठी १३ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. १४ ऑगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील.

लॉटरीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.go v.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.go v.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉटरीसाठी अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.

प्रलोभनांना बळी पडू नका

संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोंकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया