Mumbai : धोकादायक इमारतींचे वीज-पाणी तोडणार; ‘म्हाडा’ची आक्रमक भूमिका, कारवाई करण्यासाठी दिले पत्र (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : धोकादायक इमारतींचे वीज-पाणी तोडणार; ‘म्हाडा’ची आक्रमक भूमिका, कारवाई करण्यासाठी दिले पत्र

दक्षिण मुंबईतील जुन्या व अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी म्हाडाने रहिवाशांना विविध पर्याय दिले.

तेजस वाघमारे

तेजस वाघमारे/मुंबई

दक्षिण मुंबईतील जुन्या व अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी म्हाडाने रहिवाशांना विविध पर्याय दिले. मात्र तब्बल २७३६ भाडेकरू आणि रहिवासी हे म्हाडाने दिलेले पर्याय स्वीकारत नसल्याने अखेर म्हाडाने आक्रमक भूमिका घेतली आहे. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी इमारतींचे वीज पाणी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाणी, वीज तोडण्यासाठी अनुक्रमे महापालिका आणि बेस्टला पत्र देण्यात आले आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत दरवर्षी दक्षिण मुंबईतील इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. यंदाच्या सर्वेक्षणानुसार ८६ उपकरप्राप्त इमारती ह्या अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये सुमारे २२५६ निवासी व ४८० अनिवासी असे एकूण २७३६ भाडेकरू व रहिवासी वास्तव्यास आहेत. मुसळधार पाऊस, इमारतींचा संरचनात्मक कमकुवतपणा आणि संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेऊन मंडळाने इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत.

म्हाडाच्या संक्रमण शिबिरात जाण्यास इच्छुक नसलेल्या नागरिकांना पर्यायी वास्तव्यासाठी दरमहा २० हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या निर्णयाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. तर अद्यापपर्यंत ३० हून अधिक भाडेकरू हे रहिवासी मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. तर काही रहिवाशांनी स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीस मंडळाने दिल्या आहेत. त्यानंतरही रहिवाशी घरे खाली करत नसल्याने अखेर या इमारतींचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार पाणी कनेक्शन तोडण्यासाठी महानगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे. तर वीज कनेक्शन तोडण्यासाठी बेस्टला पत्र देण्यात आले आहे.

धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. रहिवासी सहकार्य करत नसल्याने धोकादायक इमारतींचे पाणी कनेक्शन तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि वीज कनेक्शन तोडण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाला पत्र दिले आहे. त्यांचे उत्तर येताच कारवाई करण्यात येईल.
रुपेश राऊत - निवासी कार्यकारी अभियंता, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

NEET पेपरफुटी हे ‘घोर पाप’; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

CJP Protest : संघर्ष सुरूच राहणार; झुरळांनी व्यक्त केला निर्धार

मोदींच्या घरासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन; मोदींच्या राजीनाम्याची मागणी, राहुल, प्रियांका ताब्यात व सुटका

सोनम वांगचुकना ‘मेदांता’मध्ये हलवण्याचे कोर्टाचे आदेश

एक ना धड भाराभर चिंध्या!