मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट हे एका कथित व्हायरल व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या व्हिडीओत, शिरसाट हे हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत, असा दावा शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. राऊत यांनी याबाबतचा कथित व्हिडीओ शेअर केला.
मंत्री संजय शिरसाट एका खोलीत बेडवर फोनवर बोलत आहेत व सिगारेट ओढत आहेत व त्यांच्या बेडशेजारी एक बॅग दिसत आहे. त्यात नोटांची बंडले आहेत. सोबत शिरसाट यांचा पाळीव श्वानही या कथित व्हिडीओत दिसत आहे.
प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीनंतर शिरसाटांचा हा व्हिडीओ माझ्याकडे आला आहे, असे राऊत म्हणाले. हा व्हिडीओ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरसाटांवर कारवाई करणार का?” असा प्रश्नदेखील राऊत यांनी उपस्थित केला.
मला टार्गेट करण्याचा प्रयत्न - शिरसाट
या व्हीडिओबाबत शिरसाट म्हणाले, मी आत्ताच तुमच्या मित्राकडून तो व्हीडिओ पाहिला. तुम्ही पाहताहेत ते माझे घर आहे. माझे बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेलो आहे. माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्यासोबत आहे. या व्हीडिओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, मला उगीच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगेमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही त्यांनी केला.
संजय राऊतांनी ठरल्याप्रमाणे भुंकण्याचे काम केले. शिंदेसाहेब दिल्लीला अमित शहासाहेबांना भेटले व त्यांनी सांगितले की माझा पक्ष लागला तर विलीन करा. परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळे पाहिले, तर यांना संताजी-धनाजी दिसतात का? असा प्रश्न आहे. ते मुर्खासारखे बोलत असतात. सकाळी उठले की एकनाथ शिंदे, दुपारी उठले की एकनाथ शिंदे, मेळावा असला की एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे ..एवढेच संजय राऊत यांचे चालू आहे. गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही, अशी टीका त्यांनी केली.