मीरा-भाईंदर पालिकेत बूट खरेदी घोटाळा; १६० रुपयांचे बूट खरेदी केले ५०० रुपयांना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार  (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

मीरा-भाईंदर पालिकेत बूट खरेदी घोटाळा; १६० रुपयांचे बूट खरेदी केले ५०० रुपयांना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

मीरा-भाईंदर महापालिकेच्या खरेदीतील घोटाळ्यांची मालिका सुरूच असून आता महापालिका शाळांमधील १० हजार २७५ विद्यार्थ्यांच्या बूट खरेदीत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या खरेदीतील घोटाळ्यांची मालिका सुरूच असून आता महापालिका शाळांमधील १० हजार २७५ विद्यार्थ्यांच्या बूट खरेदीत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे. महापालिकेने प्रति बूट जोडासाठी सुमारे ५०० रुपये ठेकेदारास मोजले असून दुसरीकडे बूट उत्पादक कंपनीकडून तेच बूट अवघ्या १६० रुपयांना विक्री केले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. दोन वर्षांच्या या ठेक्यात पहिल्याच वर्षी तब्बल ३५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या एकूण ३२ शाळा आहेत. ह्या शाळां मधून सुमारे नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांमध्ये बहुतांश सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुले शिक्षण घेत असतात. ह्या गोरगरीब विध्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या शिक्षणा सह चांगल्या दर्जाचे साहित्य देणे महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे पालिका शाळांतील विध्यार्थ्यांसाठी पालिका गणवेष, दप्तर, वह्या - पुस्तके, पाण्याची बाटली, बूट व मोजे आदी विविध शैक्षणिक साहित्य खरेदी करत असते.

तब्बल २ कोटी ४३ लाख ६० हजारांचा ठेका

महापालिकेने १७ जून २०२६ रोजी भाईंदरच्या क्रॉस गार्डन येथील जय सागर इमारतीत असलेल्या नवकर युनिफॉर्म ह्या ठेकेदारास विध्यार्थ्यांना लहान, मध्यम आणि मोठ्या बॅग तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी त्यांच्या पायाच्या आकारा प्रमाणे बूट व मोजे पुरवण्याचा ठेका दिला होता. तब्बल २ कोटी ४३ लाख ६० हजार रुपयांचा हा ठेका दिलेला आहे. लहान - मोठे आकार असले तरी बुटांची सरसकट किंमत मात्र प्रति जोडी ५०० रुपये ठरविण्यात आली. त्यानुसार १० हजार २७५ विध्यार्थी संख्येप्रमाणे खरेदी केली गेली. केवळ बूट खरेदीची चालू वर्षाची रक्कम ही ५१ लाख ३७ हजार ५०० रुपये होते.

नगरसेवकांनी विद्यार्थ्यांना केले वाटप

ठेकेदाराकडून बूट खरेदी करून महापालिकेच्या नगरसेवकांनी त्याचे विध्यार्थ्यांना वाटप केले आणि त्याची छायाचित्रे देखील समाजमाध्यमांवर शेअर केली. दरम्यान सदर बूट हे सोनॅक्सो फुटवेअर्स प्रा. लि. या उत्पादक कंपनीचे असून सदर कंपनी ही दिल्ली येथे आहे. सत्यकाम फाऊंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. कृष्णा गुप्ता यांनी सदर बूट खरेदी प्रकरणात घोटाळा असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी थेट उत्पादक कंपनी कडून बूट खरेदी करायचे सांगून दरांची माहिती घेतली.

महापालिका आयुक्तांकडे केली तक्रार

उत्पादक कंपनीने त्यांना एकदम लहान आकाराच्या बुटाची किंमत ११५ रुपये व आकार वाढेल तशी किंमत वाढेल असे सांगून सर्वात मोठ्या आकाराच्या बुटाच्या जोड १७९ रुपयांना असल्याचा दराचा तक्ता दिला. गुप्ता यांनी शाळेच्या मोठ्या बुटाची खरेदी सॅम्पल म्हणून केली व ते त्यांना अवघ्या १६० रुपयांना मिळाले. ॲड. गुप्ता यांनी उत्पादक कंपनी कडून पक्के देयक आदी सर्व मिळवले. ठेकेदाराने पुरविलेले सोनॅक्सो फुटवेअर्स प्रा. लि.चे बूट महापालिकेने प्रत्येकी ५०० रुपये जोड नुसार खरेदी केले असताना थेट त्याच बुटाच्या उत्पादक कंपनीकडून १६० रुपये प्रति जोडी दराने उपलब्ध असल्याचा दावा बिले आणि कागदपत्रांच्या आधारे ॲड. गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रारी द्वारे केला.

ठेकेदारास ३४ लाख ९३ हजार ५०० रुपये जास्त मोजले

प्रति जोड बुटाच्या दरात तब्बल ३४० रुपयांची तफावत गंभीर असून तब्बल ३४ लाख ९३ हजार ५०० रुपये हे पालिकेने ठेकेदारास जास्त मोजले. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत करून महापालिकेच्या निधीचा अपहार व नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी ‘एसीबी’कडे याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेतील दरनिश्चिती, प्रत्यक्ष पुरवठा आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापालिकेकडून निविदा समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यात गैरप्रकार आढळून आल्यास आयुक्तांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.
सचिन बांगर, अतिरिक्त आयुक्त, शिक्षण विभाग

महायुतीत ‘ब्लेम गेम’! शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला नाही - भाजप; भाजपने आधी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे - शिंदेसेना

Thane : अखेर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; शिवसेना पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी पद सोडण्याचा निर्णय

‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला CJP चा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आ‌वाहन

डिजिटल फसवणूक; पीडितांना पूर्ण भरपाई - सुप्रीम कोर्ट

झाडांची कत्तल हा विकास नाही, तर विनाश!