भाईंंदर : मीरा-भाईंदरवासीयांसाठी नवीन वर्ष आशेचा नवा किरण घेऊन येत आहे. शहराची भविष्यात डिजिटल शहर म्हणून ओळख होण्यासाठी पालिकेने “मीरा-भाईंदरला फ्री वायफाय सिटी बनवण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका भवनात झालेल्या आढावा बैठकीत केली.
बैठकीत मंत्री सरनाईक अध्यक्षस्थानी होते, तर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरनाईक म्हणाले, मीरा-भाईंदर हे देशातील झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. गत तीन वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १८०० कोटी रुपयांची विकासकामे शहरात उभी राहिली आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तंत्रज्ञानस्नेही, नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणारे नेतृत्व आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच महाराष्ट्रातील उदयोन्मुख शहरांना ‘फ्री वायफाय’ची जोड देण्याचा महाअभियान सुरू झाले आहे.
मीरा-भाईंदरला ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा मुक्त प्रवेश उपलब्ध करून देणारे हे वायफाय तंत्रज्ञान म्हणजे ‘प्रगतीचा नवा पूल’ असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
खाडीची नयनरम्यता, राष्ट्रीय उद्यानाचे सान्निध्य… आणि आता डिजिटल सोयींची भर!
शहराच्या निसर्गरम्य रूपरेषेत ‘फ्री वायफाय’ हा आधुनिकतेचा मानाचा तुरा ठरणार असल्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
मीरा-भाईंदरला एक स्वप्नवत, तंत्रज्ञानसमृद्ध, स्मार्ट सिटी बनवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. फ्री वायफाय हा त्या साकार होत असलेल्या स्वप्नाचा पहिला तेजस्वी टप्पा ठरेल. डिजिटल युगाकडे टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल शहराच्या विकासयात्रेला नवा वेग देणारे ठरेल. तसेच हा आधुनिकतेचा मानाचा तुरा ठरणार असल्याचा विश्वास आहे.प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री