भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मात्र, शहराचा प्रथम नागरिक अर्थात महापौर हा मराठीच असावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, सहसचिव कृष्णा जाधव आणि खजिनदार प्रमोद पार्टे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष दिलीप जैन तसेच आमदार नरेंद्र मेहता यांना पत्र दिले आहे. निवडणुकीतील यशाबद्दल भाजप नेत्यांचे अभिनंदन करतानाच, महापौरपदी मराठी व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी ठाम भूमिका पत्रातून मांडण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर हे महाराष्ट्रातील शहर असून येथे सर्व समाजांचा सन्मान केला जातो, मात्र मराठी राज्यात अमराठी महापौर बसविणे अनावश्यक प्रांतिक तेढ निर्माण करू शकते, असा इशारा समितीने दिला आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अमराठी उमेदवारांना संधी देण्यात आल्याने स्थानिक मराठी भाषिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या कारभारात मराठी भाषेला अग्रक्रम मिळायलाच हवा, तसेच मराठी माणूस दुय्यम ठरणार नाही, याची ठोस हमी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनविसेचे नेते रॉबर्ट डिसोझा यांनी प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाच्या संगनमताने मोठे विजय साधले गेल्याचा आरोप केला. यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने नगर सचिवांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. मीरा-भाईंदरमधील मराठी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन महापौरपदी मराठी व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मराठी महापौर न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मीरा-भाईंदर शहरातील मराठी अस्मिता आणि अस्तित्व जपण्यासाठी महापौरपदी मराठी चेहरा असणे आवश्यक असल्याची भावना आंदोलनातून व्यक्त करण्यात आली.
जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागेल
भाजपने दूरदृष्टीने निर्णय घेत मराठी महापौर द्यावा, अन्यथा मराठी जनतेचा तीव्र विरोध पाहावा लागेल, असा इशाराही गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे. बुधवारी मनसेने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ‘मराठी महापौर हवा’ या घोषणांसह आंदोलन केले. यावेळी मनसे नेते सचिन पोपळे यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीका करत, निवडणुकीत मराठी व स्थानिक उमेदवारांना डावलल्याचा आरोप केला. मराठी नगरसेवकांची संख्या जाणीवपूर्वक कमी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.