Mumbai : मिरा रोड चाकूहल्ला हे दहशतवादी कृत्य? 
मुंबई

Mumbai : मिरा रोड चाकूहल्ला हे दहशतवादी कृत्य?

मिरा रोडच्या नया नगर येथील चाकू हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून, या प्रकरणातील आरोपी झैब जुबेर अन्सारी (३१) याने इसिस या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी करण्यासाठीच हा हल्ला केल्याचे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : मिरा रोडच्या नया नगर येथील चाकू हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून, या प्रकरणातील आरोपी झैब जुबेर अन्सारी (३१) याने इसिस या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी करण्यासाठीच हा हल्ला केल्याचे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात समोर आले आहे. वैयक्तिक आयुष्यातील निराशा आणि इंटरनेटवरील कट्टरपंथी विचारांच्या प्रभावामुळे अन्सारी या टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक निष्कर्ष सांगत आहेत.

सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नयानगर भागातील एका इमारतीबाहेरच्या दोघा सुरक्षारक्षकांवर अन्सारी याने चाकूहल्ला केला होता. हल्ला करण्यापूर्वी त्याने या रक्षकांना त्यांचा धर्म कोणता असे विचारून कलमा पढण्यास सांगितले असे उघड झाले आहे. या हल्ल्यात हे दोघे जखमी झाले असून इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर अवघ्या दीड तासात पोलिसांनी अन्सारी याला अटक केली. आरंभी साध्या गुन्ह्याचे वाटणारे प्रकरण नंतर मात्र गंभीर झाले व हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला. अन्सारीला ४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या संदर्भात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी गेल्या चार महिन्यांपासून डार्क वेब आणि एन्क्रिप्टेड चॅनेल्सच्या माध्यमातून इसिसच्या हस्तकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तिकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने स्वतःहून 'लोन वुल्फ' हल्ला करण्याचे ठरवले. अशा हल्ल्यातून संघटनेचे लक्ष वेधून घेता येईल आणि आपल्याला पक्षात स्थान मिळेल, असा त्याचा समज होता.

अन्सारी हा उच्चशिक्षित असून तो अबु धाबीमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा ऑनलाइन शिक्षक होता. मात्र, डिसेंबर २०२५ मध्ये त्याची नोकरी गेली. त्याचबरोबर पत्नीशी झालेला घटस्फोट आणि कुटुंबाशी तुटलेला संपर्क यामुळे तो प्रचंड मानसिक तणावात होता. या एकाकीपणातूनच तो कट्टरपंथी ऑनलाइन प्रचाराकडे वळला.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारीने अलीकडेच झालेल्या 'पहलगाम दहशतवादी हल्ल्या'चा अभ्यास केला होता. त्याच धर्तीवर त्याने सुरक्षारक्षकांना त्यांचे धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केला. आत्महत्येचे विचार आणि दहशतवादी कृत्य यामधील द्वंद्वातून त्याने शेवटी हिंसक मार्ग निवडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अन्सारीच्या भाड्याच्या घरावर त्याने कुराणमधील आयते आणि प्रवेशासाठीच्या अटींचे स्टिकर्स लावले होते, जे त्याच्या वैचारिक स्थितीचा पुरावा मानले जात आहेत. एटीएस सध्या त्याच्या डिजिटल पावलांचा मागोवा घेत असून, त्याला या कृत्यात इतर कोणाचे पाठबळ लाभले होते का, याचा शोध घेत आहे.

तपासादरम्यान अन्सारीच्या घरातून एक हस्तलिखित पत्र जप्त करण्यात आले आहे. यामध्ये त्याने इसिसप्रति आपली निष्ठा (बैत) व्यक्त केली असून संघटनेचा झेंडाही काढला आहे. या पत्रात 'खिलाफत', 'बिलाद अल-हिंद' आणि 'खऱ्या जिहाद'ची भाषा वापरण्यात आली असून, मुस्लिम तरुणांना कुटुंबाचा विचार न करता या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत पाणीकपात; धरणांत फक्त २८.३५ टक्के पाणीसाठा

विमान कंपन्यांचा टाहो; इंधन दर परवडेना, मदतीसाठी केंद्र सरकारकडे धाव

Mumbai : न्यायासाठी संघर्ष... आणि हतबलता; पक्षकार वय-९०, सुनावणीची पुढची तारीख - २०४६

मराठी सक्तीमागे भाषा प्रेम की राजकारण?

आजचे राशिभविष्य, २९ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत