मुंबई : पावसाळा जवळ आला की, मिठी नदीवर चर्चा होते. मिठी नदी खाली असलेला खडक तोडला तर पूरस्थिती कमी होईल, असा राज्य सरकारचा अहवाल आहे. मात्र, नदीतील खडक आजही जैसे थे असून मिठी नदीतील भ्रष्टाचारावर का बोलत नाही, असा संतप्त सवाल स्थायी समिती सदस्या यामिनी जाधव यांनी केला. दरम्यान, तीन टप्प्यांत मिठी नदीतील गाळ उपसा करण्याच्या ३० कोटींच्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. दरम्यान, मिठीतील गाळ उपसा केल्याचा अहवाल दर आठवड्याला स्थायी समितीत सादर करण्यात यावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.
पवई ते शिक्षक कॉलनी, कुर्ल्यापर्यत मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात येणार आहे. यासाठी ९ कोटी ४७ लाख ३९ हजार ३४६ रुपये खर्च करण्यात येणार आहे. कुर्ला शिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर पुलापर्यत मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात येत आहे. यासाठी १० कोटी ४६ लाख ९ हजार २०० रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर बीकेसी कनेक्टर पूल, माहिम आऊटफॉल आणि त्याच्या टेल चॅनलपर्यत मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात येणार आहे. यासाठी ९ कोटी ८९ लाख १५ हजार १३१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला असता सदस्यांनी मिठी नदीतील गाळ उपसा करण्यावर प्रश्न उपस्थित केले.
मिठी नदीतील गाळ उपसा करण्याचे काम दिले त्या कंत्राटदाराला रस्त्यांचे डांबरीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे याचा अनुभव आहे. ऑऊट फॉल खासगी जागेत असल्याने गाळ काढला जात नाही, असा मुद्दा ठाकरे सेनेच्या स्थायी समिती सदस्या श्रद्धा जाधव यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मिठी नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरू झाले असून ऑऊट फॉल खासगी जागेत असले तरी गाळ काढण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.
काळ्या यादीतील कंत्राटदाराला दिले काम - आश्रफ आजमी
मिठी नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मिठीतील १ लाख मेट्रिक टन गाळ काढायचा असून अत्याधुनिक मशिनरी नाही, ज्या कंपनीला अनुभव नाही त्या कंपनीला काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे काळ्या यादीत टाकलेला कंत्राटदार गाळ उपसाचे काम करत आहे. त्यामुळे महिनाभरात गाळ उपसा करणे कसे शक्य आहे, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी केला.