मुंबई : प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘ई-पुनर्वसन’ ही एकात्मिक डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून गरीबनगरमधील ९४ पात्र झोपडीधारकांना पहिल्याच दिवशी पुनर्वसन सदनिकांचे ताबापत्र देण्यात आले.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते, अतिरिक्त महानगर आयुक्त-१ वेलरासू आणि सह महानगर आयुक्त पंकज देवरे यांच्या उपस्थितीत संगणकीकृत सदनिका वाटप कक्ष आणि ‘ई-पुनर्वसन’ प्रणाली सुरू करण्यात आली.
या प्रणालीद्वारे प्रकल्पबाधितांच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणापासून सदनिकेचा ताबा देण्यापर्यंतचे विविध टप्पे एका डिजिटल प्रक्रियेत जोडण्यात आले आहेत. मोबाईल ॲपद्वारे ई-सर्वेक्षण, आधार आधारित ओव्हीएसई पडताळणी, जुन्या वीजबिलांची ऑनलाइन पडताळणी, संयुक्त पडताळणी, परिशिष्ट-२, संगणकीकृत ई-लॉटरी, वाटपपत्र आणि ताबापत्र जारी करणे आदी प्रक्रिया आता डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहेत.
यापूर्वी पुनर्वसन प्रक्रियेतील अनेक नोंदी मॅन्युअली आणि स्वतंत्र एक्सेल फाइल्समध्ये ठेवण्यात येत होत्या.
मानवी हस्तक्षेप कमी होणार
एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, ‘ई-पुनर्वसन’मुळे पुनर्वसन प्रकरणांचा डिजिटल मागोवा घेणे, सदनिकांची उपलब्धता व वाटपाची स्थिती तपासणे आणि प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करणे शक्य होणार आहे.