सतत उलट्या होणं, भूक न लागणं आणि थोडंसं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं या त्रासामुळे एका १२ वर्षीय मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. साध्या वाटणाऱ्या या लक्षणांमागे मात्र गंभीर कारण दडलं होतं. तपासणीत तिच्या पोटात प्रचंड केसांचा गोळा साचलेला आढळला आणि शस्त्रक्रियेद्वारे तो यशस्वीरीत्या काढण्यात आला.
वयानुसार शारीरिक वाढ मंदावल्याने तपासणी...
'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार, मुंबईतील एका खासगी रुग्णालयात या मुलीवर उपचार करण्यात आले. तिचं वजन सुमारे ३९ किलो असून तिला यापूर्वी कोणताही गंभीर आजार किंवा शस्त्रक्रिया झालेली नव्हती. मात्र वयानुसार तिची शारीरिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच मंद असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यामुळे डॉक्टरांनी सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
तपासणीदरम्यान पोटात साचलेला केसांचा गोळा समोर
तपासणीदरम्यान गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील बालरोग तज्ज्ञ डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी पोटाच्या वरच्या डाव्या भागात गाठ जाणवली. त्यानंतर रक्त तपासण्या आणि सीटी स्कॅन करण्यात आले. या तपासणीत पोटात मोठा गोळा असल्याचं स्पष्ट झालं.
यानंतर करण्यात आलेल्या एंडोस्कोपीमध्ये पोटापासून लहान आतड्याच्या सुरुवातीपर्यंत पसरलेला केसांचा मोठा गोळा असल्याचं दिसून आलं. हा गोळा पोटाच्या ९० टक्क्यांहून अधिक भाग व्यापून होता.
ओपन सर्जरी करावी लागली...
डॉक्टरांनी सुरुवातीला एंडोस्कोपीद्वारे हा गोळा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा आकार मोठा आणि रचना घट्ट असल्याने पूर्णपणे काढणं सुरक्षित नव्हतं. त्यामुळे बालशल्यचिकित्सा विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. रसिकलाल शाह यांनी ओपन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.
सुमारे तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान पोटातून १६ बाय १४ सेंटीमीटर आकाराचा केसांचा गोळा बाहेर काढण्यात आला. हा गोळा जवळपास पोटाच्या आकारासारखाच होता. तपासणीत तो ‘ट्रायकोबेजोअर’ असल्याचं स्पष्ट झालं असून त्यात केस, म्युकस आणि अन्नकण आढळले. सुदैवाने कर्करोगाची कोणतीही चिन्हं आढळली नाहीत.
उपचारानंतरची स्थिती
शस्त्रक्रियेनंतर मुलीला काही दिवस बालरुग्ण विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. तिसऱ्या दिवसापासून तिला पाणी आणि हलका आहार देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू मऊ आहारावर नेण्यात आलं आणि सात दिवसांत तिला डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचार आणि आहाराबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं.
डॉक्टरांचा सल्ला
डॉक्टरांच्या मते, मानवी केस पचत नसल्यामुळे ते वारंवार गिळल्यास पोटात साचत जातात आणि कठीण गोळा तयार होतो. या प्रकरणात हा गोळा तीन ते चार वर्षांत हळूहळू तयार झाला होता.
तज्ज्ञांनी सांगितलं की, अशा प्रकारच्या समस्या काही वेळा मानसिक ताण, चिंता किंवा वर्तनाशी संबंधित विकारांमुळे उद्भवतात. त्यामुळे समुपदेशन, मानसोपचार, वर्तन उपचार आणि भावनिक आधार देणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा होऊ नयेत.