मुंबई : मुंबई अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)च्या पथकाने बुधवारी कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकाला कथित लाचखोरीप्रकरणी अटक केली. मालाड येथील रहिवाशाकडून दोन तक्रारी निकाली काढण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आणि स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने अशी आहेत. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडी सुनावण्यात आली.
तक्रारदारांविरोधात आर्थिक फसवणुकीची लेखी तक्रार कुरार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याशिवाय, तक्रारदाराच्या नातेवाइकाने २२ जानेवारीला लैंगिक अत्याचाराचा मौखिक आरोप करत तक्रार दिली होती.