Mumbai : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-अहमदाबाद वंदे भारत आता १६ ऐवजी २० डब्यांची 
मुंबई

Mumbai : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-अहमदाबाद वंदे भारत आता १६ ऐवजी २० डब्यांची

रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चार अतिरिक्त डबे कायमस्वरूपी जोडण्यात आले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वे प्रशासनाने या गाडीतील डब्यांची संख्या कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाढती प्रवासी संख्या आणि सातत्याने वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मंगळवार (दि. २८) पासून ही वंदे भारत एक्सप्रेस १६ ऐवजी २० डब्यांसह धावू लागली आहे. या निर्णयामुळे अधिक प्रवाशांना आसनव्यवस्था उपलब्ध होणार असून, मुंबई-अहमदाबाद प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी ठरणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चार अतिरिक्त डबे कायमस्वरूपी जोडण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

४ नवीन डब्यांची भर

या विस्तारामध्ये तीन एसी चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास डबा जोडण्यात आला आहे. त्यामुळे गाडीतील एकूण आसनक्षमता वाढणार आहे. वाढत्या प्रवासी मागणीचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेषतः व्यावसायिक आणि नियमित प्रवाशांसाठी ही वाढ महत्त्वाची ठरणार आहे.

५ तास ३० मिनिटांत मुंबई-अहमदाबाद प्रवास

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस सुमारे ४९१ किलोमीटरचे अंतर अवघ्या ५ तास ३० मिनिटांत पार करते. या गाडीचे थांबे मुंबई सेंट्रल, बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद येथे आहेत.

वेळापत्रक

ट्रेन क्रमांक २२९६१ अहमदाबादहून सकाळी ६.०५ वाजता सुटते आणि मुंबई सेंट्रलला सकाळी ११.४५ वाजता पोहोचते. तर मुंबई सेंट्रलहून दुपारी ३.४५ वाजता सुटणारी ट्रेन रात्री ९.१५ वाजता अहमदाबादला पोहोचते. ही गाडी रविवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावते.

वंदे भारतची वाढती लोकप्रियता

देशभरात वंदे भारत एक्सप्रेस सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये सुमारे ४ कोटी प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे ३४ टक्के इतकी आहे.

२०१९ मध्ये वंदे भारत सेवेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ९.१ कोटींहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तसेच देशभरातील वंदे भारत गाड्यांनी मिळून १ लाखांहून अधिक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गावरील डबेवाढ हा त्याच वाढत्या प्रतिसादाचा भाग मानला जात आहे.

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल

हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी