मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने प्रदूषणप्रवण ठिकाणांची यादी तयार केली आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने प्रदूषणप्रवण ठिकाणांची यादी तयार केली आहे. आतापर्यंत १७ वॉर्डमध्ये १२९ वायुप्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ‘एम’ पूर्व वॉर्डमधील सर्वाधिक २५, तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश आहे.

धारावी, मेट्रोची कामे, बुलेट ट्रेन, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर), एल्फिन्स्टन पूल आणि रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे, शिवाजी पार्क मैदानाचाही हॉटस्पॉटच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे प्रदूषण

‘एम’ पूर्व वॉर्डमध्ये घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरातील विकासकामे तसेच रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे प्रदूषणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहेत. ‘टी’ वॉर्डमध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंडमधील ९० फूट रोड आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक व विकासकामांचा समावेश आहे. ‘आर’ उत्तर वॉर्डमध्ये पश्चिम रेल्वेवरील पाचवी-सहावी मार्गिका, दहिसर गावठाण आणि महापालिकेचा दहिसर ट्रान्सपोर्ट हब प्रकल्प यांचा समावेश करण्यात आला आहे.

मोठ्या प्रकल्पांवर विशेष लक्ष

‘जी’ उत्तर वॉर्डमधील माहीम-माटुंगा परिसरातील धारावी आणि शिवाजी पार्क मैदानाचा हॉटस्पॉटमध्ये समावेश करण्यात आला आहे. ‘जी’ दक्षिण वॉर्डमध्ये वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मेट्रो-३ ची कामे, नेहरू सायन्स सेंटर पूल आणि विविध रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. ‘एफ’ दक्षिण वॉर्डमध्ये एल्फिन्स्टन पूल प्रकल्प आणि शिवडीतील झकेरिया बंदर रोडवरील राडारोडा साठवणुकीची ठिकाणे नोंदवण्यात आली आहेत. एच पूर्व वॉर्डमध्ये बीकेसी परिसरातील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटजवळील भाग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांचा समावेश आहे.

२८ कलमी नियमांची अंमलबजावणी

प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकाम व पाडकामाच्या ठिकाणी महापालिकेच्या २८ कलमी मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक हॉटस्पॉटसाठी जबाबदार अधिकारी निश्चित करून नियमित देखरेख ठेवण्याचे नियोजन आहे. हॉटस्पॉट निश्चित केल्यानंतर प्रत्यक्ष प्रदूषण किती कमी होते, बांधकामस्थळांवरील नियमांचे पालन किती प्रभावीपणे होते आणि दोषींवर किती कारवाई केली जाते, यावर या मोहिमेचे यश अवलंबून राहणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महायुतीला ‘दे धक्का’! महाविकास आघाडीचे पाचपैकी तीन जागांवर वर्चस्व, फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर भाजपचा उमेदवार पराभूत

दिवाळी गोडवा! मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये बोनस; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

मतदार यादीची शुद्धता हीच लोकशाहीची सुरक्षा

ब्राझीलच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ

आजचे राशिभविष्य, २९ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत