प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

मुंबईसह राज्यभरात उन्हाचा चटका; थंडीने गाशा गुंडाळला; आणखी काही दिवस उष्णतेचा इशारा

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीने गाशा गुंडाळला असून आता उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागला आहे. फेब्रुवारी महिना संपताच महाराष्ट्रात उन्हाचा कडाका कमालीचा वाढला असून राज्याच्या तापमानाने आता चाळीशीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

Swapnil S

मुंबई/पुणे : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीने गाशा गुंडाळला असून आता उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागला आहे. फेब्रुवारी महिना संपताच महाराष्ट्रात उन्हाचा कडाका कमालीचा वाढला असून राज्याच्या तापमानाने आता चाळीशीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. हवामान अंदाज संस्था ‘स्कायमेट’च्या भाकितानुसार, यावर्षी उन्हाळा लवकर सुरू होईल. राज्यात थंडी पूर्णपणे संपली असून मान्सूनपूर्व हंगामात प्रवेश झाला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भातील अकोला येथे मंगळवारी ३९.३ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. दुसरीकडे, जळगाव येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ६ अंशांनी वाढल्याने संपूर्ण राज्य उकाड्याने हैराण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते, जे आता निवळणार आहे. हवामान खात्याने उष्णतेत लक्षणीय वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान ३६ अंश सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच मुंबई आणि कोकण किनाऱ्यावर आर्द्रता वाढणार आहे. वायव्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काही काळ धुळीकणांचे प्रमाण वाढू शकते. वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा परिणाम कृषी क्षेत्रावरही होताना दिसत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आता वाढत्या उष्णतेमुळे शेतकरी अधिक चिंतेत पडले आहेत.

कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेसोबतच दमट हवामानाचा प्रभाव वाढला आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून वाढत्या आर्द्रतेमुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ५ आणि ६ मार्च रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे तापमानात थोडी घट होऊन दिलासा मिळू शकतो, मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

प्रभाग समित्यांचे १७ पैकी ११ अध्यक्ष बिनविरोध; मुंबईतील ६ प्रभाग समित्यांची निवडणूक ५, ६, ९ मार्चला

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार; मविआकडून शरद पवार यांना उमेदवारी; काँग्रेस, ठाकरे गटाचा पाठिंबा

आम्ही महाविकास आघाडीसोबतच! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला - जयंत पाटील

गृहनिर्माण संस्थांच्या अकृषिक कराची थकबाकी माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती