'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल

आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या दिशेने जव्हार तालुक्याने महाराष्ट्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये तालुक्यातील सर्व २६८ शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे प्रमाणपत्र मिळवत राज्यातील १०० टक्के तंबाखूमुक्त शाळा असलेला पहिला तालुका होण्याचा मान मिळविला आहे, अशी माहिती शिक्षक मधुकर भोये यांनी दिली.
'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल
Published on

जव्हार : आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या दिशेने जव्हार तालुक्याने महाराष्ट्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये तालुक्यातील सर्व २६८ शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे प्रमाणपत्र मिळवत राज्यातील १०० टक्के तंबाखूमुक्त शाळा असलेला पहिला तालुका होण्याचा मान मिळविला आहे, अशी माहिती शिक्षक मधुकर भोये यांनी दिली.

सलाम मुंबई फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभियानाला जव्हारसारख्या दुर्गम व आदिवासी भागातील शाळांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाने तंबाखूमुक्त शाळांसाठी निश्चित केलेले सर्व निकष पूर्ण करून तालुक्यातील प्रत्येक शाळेने अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त केले.

अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि शिक्षण विभागाने एकत्रितपणे विविध जनजागृती उपक्रम राबविले. तंबाखूविरोधी रॅली, रांगोळी स्पर्धा, लोकनाट्य, प्रबोधनपर व्याख्याने, विद्यार्थी-पालक संवाद तसेच कार्यशाळांच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला.

गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक आणि संपूर्ण पथकाने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यामुळे हे अभियान यशस्वी ठरले.

जव्हार तालुक्याच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीबाबत जागरूकता अधिक दृढ होणार असून आरोग्यदायी पिढी घडविण्यास मोठी चालना मिळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in