स्वीटी भागवत
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) अॅक्वा लाइनवर आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर प्रवासी सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आतापर्यंत ७.२ कोटी जणांनी प्रवास केल्याचे जाहीर केले.
मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो मार्ग असलेल्या अॅक्वा लाइनला प्रवाशांचा सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये या मार्गावर कामकाजाच्या दिवशी दररोज सरासरी २,२४,६०२, तर शनिवार-रविवारी १,३१,१३८ प्रवाशांची नोंद झाली.
संपूर्ण मार्गावरील सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एमएमआरसीकडून ‘अॅक्वा लाइन टाइम कॅप्सूल’ आणि ‘अॅक्वा लाइन पासपोर्ट अँड स्टॅम्प ट्रेल’ हे दोन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
‘टाइम कॅप्सूल’मध्ये भुयारी मेट्रो मार्गाच्या बांधकाम आणि कार्यान्वयनाशी संबंधित नोंदी, छायाचित्रे, महत्त्वाचे टप्पे आणि आठवणींच्या वस्तू जतन करण्यात येणार आहेत. एमएमआरसीच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमातून अॅक्वा लाइनचा प्रवास तसेच २०२६ मधील मुंबईचे चित्र भावी पिढ्यांसाठी जतन केले जाणार आहे.
‘पासपोर्ट अँड स्टॅम्प ट्रेल’च्या माध्यमातून प्रवाशांना आणि मेट्रोप्रेमींना अॅक्वा लाइनवर प्रवास करून मार्गावरील निवडक स्थानकांवर विशेष स्वरूपात तयार करण्यात आलेले शिक्के जमा करण्याची संधी मिळणार आहे.
एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “संपूर्ण मार्गावरील सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना अॅक्वा लाइनला स्वीकारल्याबद्दल आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्याबद्दल मी मुंबईकरांचे मनापासून आभार मानते. सात कोटी प्रवासी सफरींचा टप्पा पार करणे हे मुंबईकरांनी दाखविलेल्या विश्वासाचे आणि पाठिंब्याचे द्योतक आहे.
‘टाइम कॅप्सूल’ आणि ‘पासपोर्ट अँड स्टॅम्प ट्रेल’च्या माध्यमातून हा सामूहिक प्रवास साजरा करण्याबरोबरच त्याच्या आठवणी भावी पिढ्यांसाठी जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
ही सेवा लोकप्रिय होत आहे. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अॅक्वा लाइनची भूमिका यापुढेही महत्त्वाची राहणार असून, दैनंदिन प्रवासासाठी अधिकाधिक प्रवासी या मार्गाचा वापर करतील, असा विश्वास एमएमआरसीने व्यक्त केला आहे.
“मेट्रो-३ मुळे माझा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि सुरळीत झाला आहे. मी अनेकदा अंधेरी किंवा मरोळहून विधान भवन किंवा सीएसएमटीला प्रवास करतो. पूर्वी कार किंवा लोकलने करावा लागणारा हा प्रवास त्रासदायक होता. आता भुयारी मेट्रोमुळे दैनंदिन प्रवासात मोठा फरक पडला आहे.”विवेक पई, वाहतूक तज्ज्ञ
“मी सांताक्रूझहून सीप्झला प्रवास करते. मेट्रो-३ मुळे माझ्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. यापूर्वी या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता मेट्रोमुळे प्रवास अधिक जलद, सुरळीत आणि आरामदायी झाला आहे.”सुचिता गरुड, प्रवासी