मुंबई लोकल आणि शिस्त? बदलापूरचा व्हायरल Video पाहून नेटकरी म्हणाले, 'हे खरं आहे की AI?' 
मुंबई

मुंबई लोकल आणि शिस्त? बदलापूरचा व्हायरल Video पाहून नेटकरी म्हणाले, 'हे खरं आहे की AI?'

मुंबईची लोकल म्हटलं की डोळ्यासमोर धावपळ, अफाट गर्दी आणि सततचा गोंधळ उभा राहतो. नेहमीच्या गोंधळाच्या प्रतिमेला छेद देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क मुंबईकर लोकलमध्ये रांगेत चढताना दिसतायत...

Mayuri Gawade

मुंबई लोकल म्हटलं की डोळ्यासमोर धावपळ, अफाट गर्दी आणि सततचा गोंधळ उभा राहतो. दररोज लाखो मुंबईकर लोकलने प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी धावपळ करतात, ट्रेन पूर्ण थांबण्याआधीच चढ–उतार करतात. त्यामुळे लोकल प्रवास म्हणजे शिस्तीपेक्षा गडबड अधिक, अशीच सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, नुकताच समोर आलेला एक व्हिडिओ ही समजूत खोटी ठरवणारा आहे.

बदलापूर स्थानकावरील या व्हिडिओमध्ये लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यासमोर प्रवासी अगदी शिस्तबद्ध रांगेत उभे असल्याचं स्पष्टपणे दिसतं. ट्रेन येईपर्यंत कोणीही गर्दी करत नाही, धक्का बुक्की नाही, आरडाओरडा नाही. ट्रेन स्थानकात थांबल्यानंतर प्रवासी आपापल्या क्रमाने डब्यात चढताना दिसतात. मुंबईसारख्या शहरात, तेही लोकल प्रवासात, असं दृश्य फार क्वचितच पाहायला मिळते.

या व्हिडिओमध्ये कुठलाही झगमगाट किंवा कुठली खास बाब नसतानाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. कारण, इथे दिसणारी गोष्ट म्हणजे साधी पण दुर्मीळ असलेली 'शिस्त'. नेहमीच्या गोंधळाच्या प्रतिमेला छेद देणारा हा क्षण पाहून अनेकांनी पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहिला.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. काही जणांना हे दृश्य खरे आहे, यावरच विश्वास बसला नाही. एका सोशल मीडिया युजरने लिहिलं, "खरंच मुंबईचं आहे का, की कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेला व्हिडिओ आहे?" तर दुसऱ्याने थेट टिप्पणी केली, "हे सगळं एआय आहे."

दरम्यान, या व्हिडिओमुळे प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी प्रवाशांमधील शिस्तीवरही चर्चा सुरू झाली. एका महिलेने प्रतिक्रिया देताना म्हटलं, "ही प्रथम श्रेणीची रांग आहे. द्वितीय श्रेणीमध्ये अशी शिस्त कधीच पाळली जात नाही." या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी अनुभवाच्या आधारे सहमती दर्शवली, तर काहींनी नागरी शिस्त ही तिकीटाच्या वर्गावर अवलंबून नसावी, असं ठामपणे मांडलं. एकूणच, बदलापूरच्या या दृश्याने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

Mumbai : नालेसफाईचे काम अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही; नालेसफाई रखडल्यामुळे महापौरांचा अजब निर्णय

राज्यात गॅस, इंधनाचा पुरेसा साठा आहे; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भुजबळांचे आवाहन

Mumbai : महापौरांचा VIP थाट कायम! मोटारीवर लखलखणार दिवे

२४ अनधिकृत नर्सिंग होम्सवर कारवाईचा बडगा; जन्म नोंदणी फॉर्म देणे बंद; बनावट प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर BMC चा कठोर पवित्रा

BMC सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करा! ठाकरे सेनेच्या अंकित प्रभू यांची सूचना