Mumbai : प्रवाशांसाठी खुशखबर! स्लीपर वंदे भारत ट्रेनला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; CSMT ते बंगळुरू धावणार 
मुंबई

Mumbai : प्रवाशांसाठी खुशखबर! स्लीपर वंदे भारत ट्रेनला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; CSMT ते बंगळुरू धावणार

मुंबई ते बेंगळुरू दरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेनला रेल्वेमंत्र्यांची मंजुरी मिळाली असून यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक आरामदायी आणि वेगवान सेवा उपलब्ध होणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई आणि बंगळुरूदरम्यान रेल्वे प्रवास अधिक वेगवान व आरामदायी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मार्गावर 'स्लीपर वंदे भारत' ट्रेन सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

CSMT ते KSR बंगळुरू दरम्यान धावणार

ही नवी स्लीपर ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बंगळुरू (KSR Bengaluru City Junction) दरम्यान धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत पत्रातून समोर आली आहे. प्रवासी सुविधांबाबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विशेष डिझाइन

सध्या धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन प्रामुख्याने चेअर कार स्वरूपात असतात. मात्र, लांब अंतराच्या प्रवासासाठी विशेष स्लीपर ट्रेन तयार करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये अधिक आरामदायी सुविधा, आधुनिक सोयी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे.

व्यस्त मार्गावर दिलासा

मुंबई-बंगळुरू मार्ग हा देशातील सर्वाधिक व्यस्त इंटरसिटी मार्गांपैकी एक आहे. व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. नव्या स्लीपर ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. या ट्रेनमुळे विमान आणि रेल्वे प्रवासातील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे

लवकरच वेळापत्रक जाहीर होणार

या ट्रेनचे वेळापत्रक, भाडे आणि सेवा सुरू होण्याची तारीख यासंबंधीची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्लीपर वंदे भारतचा विस्तार

देशभरात वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेनचा विस्तार करण्यासाठी रेल्वेने मोठी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर चालू वर्षाच्या अखेरीस तब्बल १२ वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ट्रेनची निर्मिती सध्या वेगाने सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असली, तरी ही ट्रेन नेमकी कोणत्या मार्गावर धावणार याबाबत स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही.

याचवेळी, पी. सी. मोहन यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते केएसआर बंगळुरू या महत्त्वाच्या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वेकडे केली होती. या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मुंबई-बेंगळुरू मार्गावर स्लीपर वंदे भारत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वे आधुनिकीकरणाला चालना

ही योजना भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या व्यापक धोरणाचा भाग असून प्रमुख मार्गांवरील प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येत आहे.

Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण

Mumbai : नालेसफाईच्या कामात तीन तेरा; मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात अपुरी यंत्रणा, सत्ताधारी पक्षाच्या पाहणी दौऱ्यात पोलखोल

रेल्वेच्या PRS प्रणालीमुळे बुकिंग क्षमतेत वाढ होणार; गर्दीच्या वेळेत वेग, विश्वासार्हता सुधारण्याचा प्रयत्न

Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात; प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवण्याची महसूल विभागाची तयारी