Mumbai : विचित्र अपघातात बेस्ट वाहकाचा मृत्यू; अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन  (संग्रहित छायाचित्र FPJ)
मुंबई

Mumbai : विचित्र अपघातात बेस्ट वाहकाचा मृत्यू; अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन 

अंधेरी पश्चिम आंबिवली नाका येथे गुरुवारी दुपारी बेस्ट बसने आणखी तीन बेस्टच्या बसना धडक दिली.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पश्चिम आंबिवली नाका येथे गुरुवारी दुपारी बेस्ट बसने आणखी तीन बेस्टच्या बसना धडक दिली. या विचित्र अपघातात कंडक्टरचा मृत्यू झाला. शेखर बाबूराव रावते (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.‌ दरम्यान, या अपघाताच्या चौकशीसाठी बेस्ट उपक्रमाने समिती स्थापन केली आहे.

ओशिवरा आगारातील पीएमआय कंत्राटदाराची मार्ग क्रमांक २५१ वरील बस  अंधेरी स्थानक पश्चिम येथून वर्सोवा येथे जात होती. दरम्यान, अंबोली नाका येथे झाड कोसळल्याने मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे  मातेश्वरी कंत्राटदाराच्या बस मार्ग क्रमांक २६६, २४२ आणि २४९ वरील बसेस  एकामागोमाग या तीन बस रांगेत उभ्या होत्या. याचवेळी मागून आलेल्या २५१ च्या पीएमआयच्या बसने उभ्या असलेल्या  बसगाड्याना  मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे या बस एकमेकांवर एकामागोमाग आदळल्या या साखळी धडकेत मातेश्वरी कंपनीचे बसचे बस वाहक शेखर बाबुराव रावते मागील बाजूकडून जात असताना दोन बसच्या  मध्ये अडकले. धडकेमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.  अपघातानंतर पीएमआय बसच्या वाहकाने त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रावते हे मातेश्वरी ऑपरेटरकडे वाहक म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी पोलीस आणि परिवहन प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची शहानिशा आणि सखोल तपास सुरू आहे. अपघाताची कारणे व शोध घेण्यासाठी, तसेच आवश्यक त्या सुधारणात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवण्यासाठी 'बेस्ट' प्रशासनाने एक चौकशी समिती स्थापन केली आहे.

या घटनेनंतर पोलिस आणि बेस्ट प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त बस गाड्यांना बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर सुरु झाली. मात्र काही काळ या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

मुंबई : विरारमध्ये राहणारे शेखर बाबुराव रावते गुरुवारी सकाळी इतर दिवसांसारखेच कर्तव्यावर जाण्यासाठी घरातून निघाले होते. घरातून निघण्यापूर्वी त्यांनी लहान मुलाशी किराणा सामान आणण्याबाबत चर्चाही केली होती. मात्र, काही तासांनंतर ५३ वर्षीय बेस्ट बस वाहक शेखर रावते यांचा अंधेरी पश्चिम येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी त्यांच्या कुटुंबाला मिळाली. या बातमीमुळे रावते यांचे कुटुंब आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

महिंद्रा ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा त्यांचा मोठा मुलगा प्रथमेश रावते याने सांगितले की, या अचानक झालेल्या दुर्घटनेवर कुटुंबाचा अद्याप विश्वास बसत नाहीये. शेजारी आणि नातेवाईकांनी रावते यांचे अत्यंत नम्र आणि कष्टाळू व्यक्ती म्हणून वर्णन केले. त्यांनी सार्वजनिक वाहतूक सेवेत अनेक वर्षे काम केले होते. सध्याच्या बेस्टच्या वेट लीज सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी वसई-विरार शहर बस सेवेतही काम केले होते.

Mumbai Water Cut: मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात

ठाण्यातील ४६ विहिरींचे पुनरुज्जीवन होणार; आर.ओ. प्लांटद्वारे नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार

Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस

Mumbai : पश्चिम रेल्वेवर आज रात्री मोठा ब्लॉक; धीम्या मार्गावर ११.३१ वाजता शेवटची लोकल

वाहनांना HSRP प्लेट बसविणे अनिवार्य; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड