मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, भुलेश्वरमध्ये आगमन सोहळ्यात २२ फूट उंच गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही समावेश आहे. या घटनेमुळे मुंबईच्या गणेशोत्सवाला गालबोट लागले असून उंच पीओपी मूर्तींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या २२ फूट उंच गणेशमूर्तीचे आगमन भायखळा येथील बकरी अड्ड्यावरून भुलेश्वर कबुतरखाना येथील मंडपात होत होते. मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर असताना मूर्ती अचानक पुढील बाजूस कलंडून जमिनीवर कोसळली.
या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे उपविभागप्रमुख संकेत नेवशे (३३) तसेच बृजेश जोशी (३०) यांचा मृत्यू झाला, तर वैभव घेनंद (३८), पवन चौरसिया (२५), लावण्या गाणेर (५), दिव्या गाणेर (५) आणि कुणाल काशिद (२६) हे जखमी झाले. सर्व जखमींवर जेजे आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
भुलेश्वरचा राजा मंडळाचे यंदाचे ६३ वे वर्ष आहे. गिरगाव, भुलेश्वर आणि खेतवाडी परिसरातील उंच गणेशमूर्तींसाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. यंदा आठ हात असलेली आणि शेषनागाच्या वेटोळ्यावर विराजमान झालेली २२ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली होती. प्रसिद्ध मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी ही मूर्ती घडविली होती. मूर्तीचे आगमन मूळतः २९ ऑगस्ट रोजी होणार होते; मात्र मंडळाने कार्यक्रमात बदल करून २२ ऑगस्टलाच आगमन सोहळा आयोजित केला होता.
वेल्डिंगमधील दोषामुळे अपघात ?
अग्निशमन दलाने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, शनिवारी संध्याकाळी भायखळ्यावरून भुलेश्वरकडे येत असताना नाक्यावर क्रेनच्या मदतीने मूर्ती ट्रॉलीवरून पुढे घेऊन जात असताना हा अपघात घडला. तपासातून असे निदर्शनास आले की, मूर्तीला आधार देणारे महत्त्वाचे नटबोल्ट निघाले होते. क्रेनच्या सहाय्याने मूर्ती हलवली जात असताना नटबोल्टवरील ताण अचानक वाढला आणि ते निसटल्याने भव्य मूर्ती थेट खाली कोसळली, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृतरीत्या कोणतेही भाष्य केले नसून पुढील तपास सुरू आहे.
उंच पीओपी मूर्तींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
उंच पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. पीओपी मूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याने सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतांतील विसर्जनाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने यंदाच्या वर्षापुरती सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींना नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे. हा वाद काहीसा शांत होत असतानाच भुलेश्वरमधील दुर्घटनेमुळे उंच मूर्तींच्या सुरक्षिततेचा आणि आगमन-विसर्जन व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.