मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील डायमंड मार्केटजवळ मेट्रो मार्गिका २बीच्या बांधकामादरम्यान बुधवारी (दि. १५) पहाटे मोठा अपघात घडला. प्री-कास्ट बीम (सिमेंटचा खांब) उचलत असताना सुमारे ४०० टन वजनाची क्रेन उलटल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) दिली.
यांत्रिक बिघाडामुळे अपघात
एमएमआरडीएच्या निवेदनानुसार, अंधेरी पश्चिम-मंडाले (मानखुर्द) मेट्रो लाईन २बीच्या कामादरम्यान एशियन हार्ट हॉस्पिटलजवळ प्री-कास्ट बीम उचलताना यांत्रिक बिघाड झाला. कंत्राटदार जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीकडून रात्रीच्या वेळी हे काम सुरू होते.
प्राथमिक तपासात, एका मोबाईल क्रेनच्या लिफ्टिंग बूममध्ये गिअर फेल्युअर झाल्याचे समोर आले. त्यानंतर भार दुसऱ्या क्रेनवर गेल्याने तीही उलटली आणि हा अपघात घडला.
पहाटे ४ ते ४.३० दरम्यान घटना
एमएमआरडीएचे संचालक बासवराज एम.बी. यांनी सांगितले की, "ही घटना पहाटे सुमारे ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. हा टप्पा महत्त्वाच्या लिफ्टिंग ऑपरेशनचा भाग होता."
तातडीने उपाययोजना
घटनेनंतर एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उलटलेली क्रेन सुरक्षितपणे हटवण्यासाठी ६०० टन क्षमतेची क्रेन तैनात करण्यात आली. तसेच, घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या.
वाहतुकीवर परिणाम, पर्यायी मार्ग जाहीर
या अपघातामुळे बीकेसी परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. विशेषतः कुर्ला आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसला.
या घटनेमुळे वाहतूक पोलिसांनी आयसीआयसीआय बँक बसथांब्याजवळून वाहतूक वळवली. तसेच, डायमंड मार्केट गेट क्रमांक ८मार्गे वाहने वळवून धीरूभाई अंबानी चौकातून यू-टर्नची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. कुर्ल्याहून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे किंवा भारत नगरकडे जाणाऱ्या वाहनांना डायमंड मार्केट सिग्नलवर डावीकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
एमएमआरडीएकडून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात आले. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे.