मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न शाळांमधील पहिली तुकडी यंदा दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहे. पालिकेच्या १८ सीबीएसई शाळांपैकी १० शाळांमधील तब्बल ३६६ विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देत असून त्यांच्या तयारीसाठी विशेष अभ्यास व मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात येत आहेत.
या विद्यार्थ्यांकडून नियमितपणे सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात असून परीक्षाभिमुख तयारीवर भर दिला जात आहे. यासोबतच काही खासगी सीबीएसई शाळांमधील तज्ज्ञ शिक्षकांचेही मार्गदर्शन पालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
महापालिका शिक्षण विभागाकडून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगू आणि कन्नड अशा आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते तसेच एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा चार मंडळांचे अभ्यासक्रम पालिकेच्या शाळांमध्ये शिकवले जातात. आतापर्यंत एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष अभ्यास उपक्रमांचा मोठा फायदा होत असून दहावीचा निकाल ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
विशेष तयारी उपक्रम
आता सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष तयारी उपक्रम राबवले जात आहेत. येत्या १७ फेब्रुवारी २०२६ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत सीबीएसई दहावीची परीक्षा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्याचे तंत्र, वेळ व्यवस्थापन आणि उत्तरलेखन कौशल्य याबाबत विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑनलाईन मार्गदर्शनाचाही समावेश
पालिकेच्या शाळांमधील विषय शिक्षकांकडून गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इंग्रजी तसेच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करून सराव करून घेतला जात आहे. याशिवाय काही खासगी सीबीएसई शाळांमधील तज्ज्ञ शिक्षकांकडून उत्तरपत्रिका कशी लिहावी, याबाबत ऑनलाईन मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.