Mumbai : उद्यान, मैदानात आता राज्य सुरक्षा मंडळाचे जवान तैनात; अमित साटम यांची आयुक्तांबरोबर बैठक संपन्न 
मुंबई

Mumbai : उद्यान, मैदानात आता राज्य सुरक्षा मंडळाचे जवान तैनात; अमित साटम यांची आयुक्तांबरोबर बैठक संपन्न

कुर्ला येथील उद्यानात तरुण-तरुणीला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल उचलले आहे.

Swapnil S

मुंबई : कुर्ला येथील उद्यानात तरुण-तरुणीला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल उचलले आहे. मुंबईतील उद्याने, खेळाची मैदाने व मोकळ्या जागांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी असुरक्षित व संवेदनशील उद्याने व मोकळ्या जागांची यादी तयार करणे, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करणे, अशा उपाययोजना करण्याचे सुचविल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले.

मुंबई पालिकेच्या पायाभूत सुविधांच्या जाळ्यांचे व्यापक दस्तऐवजीकरण करण्यासाठी माहिती व्यवस्थापन उपक्रमाचा विस्तार, सर्व महापालिका कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात मिळणारी सवलत प्रत्यक्षात मिळते की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण व्यवस्था अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी दिली. आमदार अमित साटम यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि प्राजक्ता लवंगारे-वर्मा तसेच महापालिका क्षमता बांधणी व संशोधन केंद्राच्या (एमसीएमसीआर) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत या सूचना देण्यात आल्या. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक सक्षम करण्यासाठी एमसीएमसीआरची भूमिका बळकट करून हे केंद्र अधिक प्रभावी करण्याचा या बैठकीमागील उद्देश असल्याचे साटम यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण अनिवार्य

सर्व कर्मचाऱ्यांसाठी एमसीएमसीआरच्या माध्यमातून एक निश्चित वार्षिक प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये संवादकौशल्य, नागरिकाभिमुख दृष्टिकोन आणि सेवा वितरणाचा दर्जा उंचावण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन ते पालिका उपायुक्तांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याने दरवर्षी किमान निर्धारित प्रशिक्षण तास पूर्ण करणे प्रस्तावित आहे.

प्रत्येक सेवेत सुधारणा करण्यावर भर!

मुंबईकरांना पालिकेचे ग्राहक मानून त्यांना अधिक चांगल्या आणि कार्यक्षम सेवा कशा देता येतील, याची जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संवाद कौशल्यापासून ते सेवा देण्याच्या पद्धतीपर्यंत सर्वच बाबींमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाईल, असे साटम यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

Mumbai : आता १३०० झाडांचा बळी; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी पालिकेने झाडांवर चिकटविल्या नोटिसा

नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले

नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी