मुंबई महानगरपालिका संग्रहित छायाचित्र
मुंबई

BMC रुग्णालयांना सुरक्षा कवच; बसविणार आग प्रतिबंधक प्रणाली; खर्च २ कोटी ३६ लाख रुपये; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांना प्राधान्य देत विद्युत पॅनल्स, स्विच बोर्ड, एमसीबी बोर्ड तसेच उपहारगृहांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे २ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांना प्राधान्य देत विद्युत पॅनल्स, स्विच बोर्ड, एमसीबी बोर्ड तसेच उपहारगृहांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे २ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय (शीव), डॉ. आर. एन. कुपर रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय समूह, संत मुक्ताबाई महापालिका रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, अपघात विभाग आणि विविध विशेष विभाग हे २४ तास कार्यरत असल्याने उच्च क्षमतेची वैद्यकीय उपकरणे आणि विद्युत यंत्रणा येथे सातत्याने सुरू असतात.

या रुग्णालयांमध्ये बसविण्यात आलेले विद्युत पॅनल्स, स्विचबोर्ड आणि एमसीबी बोर्ड यामध्ये शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाडामुळे आग लागण्याचा धोका कायम असतो. तसेच रुग्णालय परिसरातील उपहारगृहांमध्ये गॅस शेगड्यांचा सतत वापर होत असल्याने तेल, उष्णता आणि ज्वाळांमुळे आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आग लागल्यास रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विद्युत पॅनल्समध्ये विशेष स्वयंचलित अग्निशमन प्रणाली, स्विचबोर्ड आणि एमसीबी बोर्डमध्ये अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा तसेच उपहारगृहांमध्ये केएफडी प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. आग लागल्यास या यंत्रणा तात्काळ सक्रिय होऊन प्रारंभीच ज्वाळांवर नियंत्रण मिळवतील, त्यामुळे मोठी दुर्घटना टाळणे शक्य होणार आहे.

संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित स्वरूपाची

रुग्णालयांमधील अखंड आरोग्यसेवा अबाधित ठेवणे, मानवी जीविताचे संरक्षण करणे आणि मालमत्तेचे नुकसान टाळणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे ही संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित स्वरूपाची असल्याने मानवी हस्तक्षेपाशिवाय आग ओळखून तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी 'अजंता इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स एलएलपी' या कंपनीची निवड करण्यात आली असून सुमारे २.३६ कोटी रुपयांच्या खर्चातून रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे मजबूत कवच उभारले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

पुण्यात दोन CA विरोधात गुन्हा; 'शेल'च्या माध्यमातून ४,४२७ कोटींची करचुकवेगिरी

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

IND W Vs SL W Asian Games Final: भारताची सुवर्णपदकासाठी आज श्रीलंकेशी लढत