Mumbai : सुधार समितीच्या कामकाजात नियमभंग; विरोधकांचा न्यायालयात जाण्याचा इशारा संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सुधार समितीच्या कामकाजात नियमभंग; विरोधकांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

मुंबई महापालिकेच्या सुधार समितीतील कामकाजावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सुधार समितीतील कामकाजावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. समितीच्या बैठकीत नियमांचे पालन होत नसल्याचा गंभीर आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेने सचिव विभागाला लक्ष्य केले आहे. उपसचिवांकडूनच सभाशास्त्र आणि महापालिका अधिनियमातील नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून हे प्रकार थांबले नाहीत तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

सुधार समितीच्या बैठकीत अध्यक्षांना सभाशास्त्रानुसार मार्गदर्शन करणे, तसेच मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील नियमांची माहिती देणे ही सचिव विभागाची जबाबदारी आहे. मात्र, उपसचिव प्रियांका देसाई यांच्या कार्यपद्धतीवर सुधार समिती सदस्य सचिन पडवळ यांनी आक्षेप घेतला आहे.

विरोधी सदस्यांनी प्रस्तावांवर उपसूचना मांडल्यानंतर त्यावर नियमानुसार मतदान होणे अपेक्षित असताना मतदान न घेताच प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचा आरोप सचिन पडवळ यांनी केला आहे. विशेषतः आरक्षण बदलाच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होणे आवश्यक असतानाही असे प्रस्ताव चर्चेविना मंजूर केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी, महत्त्वाचे प्रस्ताव 'डीम टू पास' होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी सविस्तर चर्चेची मागणी जोरदार लावून धरली आहे.

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

या प्रक्रियेमुळे शहरातील नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे आणि उद्यानांसारख्या सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणात बदल करून ती निवासी वापरासाठी खुली करण्याचे प्रकार घडत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. अशा निर्णयांचा फायदा विकासकांना होण्याची शक्यता असल्याने या संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

न्यायालयात दाद मागणार

आतापर्यंत मंजूर झालेल्या प्रस्तावांचे इतिवृत्त उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सचिन पडवळ यांनी सचिव मनोज कांबळे यांच्याकडे केली आहे. इतिवृत्ताच्या आधारे समितीतील कामकाजाची सत्यस्थिती समोर आणून आवश्यक असल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

समितीच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करा!

महापालिका सभागृहाच्या धर्तीवर सुधार समितीच्या बैठकींचेही थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे समितीतील चर्चा, सदस्यांच्या सूचना आणि प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया नागरिकांसमोर येईल. आता सत्ताधारी भाजप-शिवसेना युती या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

कर्जतमध्ये १०० एकरावर ‘अनंत आश्रय’; अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी वसाहत; पाच हजारांसाठी आयुष्यभराचा निवारा

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग