मुंबई : चेंबूर डायमंड उद्यानाजवळ स्कूल व्हॅन वर पिंपळाचे झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा करुण अंत झाला. या घटनेनंतर झाडे व पादचाऱ्यांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नावाखाली झाडांच्या मुळांवर घाला घालण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता महापालिकेच्या २६ वॉर्डांत प्रत्येकी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
रस्ते, उद्याने, पर्जन्यजलवाहिन्या आणि युटिलिटी विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर राहणार असून झाडांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात येत असलेली प्रमाणित मानक कार्यप्रणाली (एसओपी) ऑक्टोबरपासून लागू करण्याचे नियोजन असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
३० जून रोजी चेंबूरमध्ये पिंपळाचे झाड शालेय बसवर कोसळल्याने विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर पालिकेने केलेल्या उपाययोजनांमध्ये झाडांच्या सुरक्षेला पायाभूत सुविधा प्रकल्पांचाच अविभाज्य भाग मानण्यावर भर देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण करताना झाडांच्या बुंध्याभोवतीचा तीन बाय तीन मीटरचा भाग डांबरी पृष्ठभागात ठेवावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे झाडांच्या मुळांना हवा, पाणी मिळण्यास मदत होणार आहे. वृक्षछाटणीवेळी वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पुनर्रोपणाचा पर्याय
नव्या एसओपीमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पवेळी झाडांचे नुकसान टाळण्यासाठी उपायांचा समावेश केला जाणार आहे. उत्खननाच्या वेळी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली वैज्ञानिक पद्धतीने झाडांच्या मुळांचे संरक्षण करणे बंधनकारक करण्याचा विचार आहे. मुळांचे नुकसान टाळणे अशक्य असल्यास बाधित झाडांचे मोकळ्या जागेचा पर्याय ठेवण्यात येणार आहे.
अहवाल ऑक्टोबरमध्ये?
चेंबूर दुर्घटनेची फेरचौकशी करण्यासाठी महापालिकेने माजी कुलगुरू प्रा. डॉ. संजय देशमुख यांची समिती ३० जुलै रोजी नियुक्त केली. समितीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. अहवाल पूर्ण करण्यास विलंब होत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. हा अहवाल आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे.
कमी उंचीच्या झाडांना प्राधान्य
भविष्यात रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करताना उपलब्ध जागेचा विचार करून स्थानिक, योग्य आकाराच्या आणि तुलनेने कमी उंचीच्या झाडांच्या प्रजातींना प्राधान्य देण्याचेही नियोजन आहे. झाडांच्या बुंध्याभोवती होणारे अतिरिक्त काँक्रीटीकरण कमी करण्यावरही भर दिला जाणार आहे.
प्रत्येक वॉर्डात अभियंत्यावर जबाबदारी
रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकारी नेमला जाणार आहे. संबंधित वॉर्डातील अभियंत्यावर ही जबाबदारी सोपविली जाणार असून, नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
झाडांच्या जोखमीचे मूल्यांकन होणार
पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने झाडांच्या जोखमीचे मूल्यांकन करणे, तसेच मुसळधार पाऊस, चक्रीवादळ किंवा तीव्र वादळानंतर रस्त्यालगतच्या जुन्या आणि पूर्ण वाढलेल्या झाडांची तातडीने पाहणी करण्याची तरतूदही एसओपीमध्ये असेल.