मुंबई : मॅनहोलवर संरक्षक जाळी आहे की नाही, दुरुस्ती करणे याची तपासणी करताना मॅनहोल उघडे करावे लागतात. मात्र मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना घडू नये, यासाठी ‘मॅनहोल रेलगार्ड’ विकसित करण्यात आले आहे. या प्रतिकृतीची महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी विविध नगरसेवक व नगरसेविकादेखील उपस्थित होते. या प्रतिकृतीची सविस्तर माहिती घेतल्यानंतर महापौर तावडे तसेच अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी तिच्या प्रभावी वापराच्या दृष्टीने काही सूचना केल्या. मॅनहोलच्या आकारानुसार रेलगार्डचा आकार सहजपणे कमी-जास्त करता येणे, काळोखात दृश्यमानता वाढावी, यासाठी त्यावर परावर्तक रंग लावणे किंवा लुकलुकणारे दिवे बसवणे, यांसह इतरही सूचना दोघांनी केल्या.
ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील एल. प्रशासकीय विभागामध्ये वापरात आणली जाणार आहे. या विभागात प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यानंतर, तेथील अनुभव पाहून तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे ‘मॅनहोल रेलगार्ड’ची जडणघडण कशी असावी, याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
तसेच, या प्रायोगिक चाचणीदरम्यान मिळणारे अनुभव आणि सूचनांचा अभ्यास करून, मुंबईतील इतर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये या प्रतिकृतीचा वापर करावा की नाही, याबाबतचा पुढील निर्णय महानगरपालिका प्रशासनातर्फे घेतला जाईल.
असे असेल ‘मॅनहोल रेलगार्ड’
नागरिक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या चौकोनी आकाराच्या ‘मॅनहोल रेलगार्ड’ची रचना मजबूत आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. उंची १ मीटर, लांबी १.५ मीटर आणि रुंदी १.५ मीटर असा आकार असलेल्या या रेलगार्डमध्ये, गरजेनुसार व विविध ठिकाणांच्या आवश्यकतेनुसार वापरासाठी २२५ किलो आणि ८० किलो असे दोन वेगवेगळे वजनी पर्याय उपलब्ध आहेत.