मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी येथील प्रस्तावित शैक्षणिक सहल रद्द करण्याची आणि महापालिकेकडून होत असलेले शिक्षणाचे भगवीकरण थांबवण्याची मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात रईस शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विन भिडे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी केशव सृष्टीतील शैक्षणिक सहलीला विरोध केला आहे.
महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची पर्यावरण अध्ययन आणि प्रशिक्षण सहल भाईंदर उत्तन येथील केशव सृष्टी येथे नेण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत येणार आहे. या सहलीसाठी महापालिका २ कोटी ४३ लाख रुपये मोजणार असून हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
शिक्षणाच्या भगवीकरणाचा हा प्रयत्न...
केशव सृष्टी सारख्या धार्मिक एकारलेपणा असलेल्या संस्थेमध्ये महापालिकेच्या विद्यार्थ्यांची सहल नेणे म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. पालिका प्रशासन हे राज्यघटनेला जबाबदार आहे आणि भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. धार्मिक उद्दिष्ट असलेल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करणे घटनाविरोधी असल्याचे शेख यांनी पत्रात नमूद केले आहे.
'आरएसएस'शी केशव सृष्टी संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून केशव सृष्टी स्थापन झाली. येथे भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होते. संघ ही भाजपची मातृसंस्था असून 'हिंदुराष्ट्र' हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. जे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे, याकडे शेख यांनी लक्ष वेधले आहे.