संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबईतील कचरा आता तळोजा डम्पिंग ग्राऊंडवर! विरोधामुळे अंबरनाथ येथील डम्पिंगचा निर्णय रखडला

Swapnil S

मुंबई : मुंबईची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात पोहोचली आहे. मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. मुंबईत दररोज साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. मात्र मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवी मुंबई तळोजा येथे ५२ हेक्टर जागेवर डम्पिंग ग्राऊंड उभारले जाणार आहे. यातील ३० हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित २२ हेक्टर जागेचा ताबा मिळाला व परवानग्या आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुंबईतील संपूर्ण कचरा टाकण्यासाठी तळोजा डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध केले जाणार आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे मुंबई उपनगरांतील मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड महापालिकेने बंद केले. मात्र कांजूरमार्ग व क्षमता संपलेले देवनार डम्पिंग ग्राऊंड अजूनही सुरू आहे. ही दोन्ही डम्पिंग ग्राऊंड बंद करून तळोजा येथील ५२ हेक्टर जमिनीवर डम्पिंग ग्राऊंड सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तळोजा येथील जागेवर डम्पिंग गाऊंड सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील डम्पिंग बंद करण्यात आले आहे. मात्र कांजूर व देवनार येथील डम्पिंग आजही सुरू आहेत. यातील कांजूर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. मात्र क्षमता संपलेल्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवर मुंबईतील कचरा टाकला जात असून तेथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. ही दोन्ही डम्पिंग ग्राऊंड नागरी वसाहतीपासून जवळपास असल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे ही दोन्ही डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडची कचरा सामावून घेण्याची क्षमता १२ वर्षांपूर्वीच संपली आहे.

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यानंतर मुंबईचा कचरा टाकायचा कुठे, याचा पालिका प्रशासनासमोर मोठा प्रश्न होता. त्याची शोधाशोध असताना, तळोजा येथे ५२ हेक्टर जागा घेण्यात आली आहे. त्यापैकी ३० हेक्टर जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे. २२ हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर त्या जागेवर अत्याधुनिक असे डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईचा कचरा त्या ग्राऊंडवर टाकला जाईल आणि मुंबई लवकरच डम्पिंग ग्राऊंडमुक्त होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विरोधामुळे अंबरनाथ येथील डम्पिंगचा निर्णय रखडला

अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील जागेवर मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास आहे. त्यांनी डम्पिंग ग्राऊंडला विरोध केल्याने येथे डम्पिंग ग्राऊंड उभे करण्याबाबतचा निर्णय मागे पडला आहे. त्यामुळे तळोजा येथील डम्पिंग ग्राऊंड उभारण्यासाठी पालिकेकडून आवश्यक प्रक्रिया सुरू आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत