Mumbai : वाकोला नदीजवळच संरक्षक जाळ्या बसवणार; पालिका पावणेदोन कोटी खर्च करणार  (Photo- https://www.mcgm.gov.in/)
मुंबई

Mumbai : वाकोला नदीजवळच संरक्षक जाळ्या बसवणार; पालिका पावणेदोन कोटी खर्च करणार

ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टीलगत वाकोला नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने नदीत तरंगणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.

Swapnil S

मुंबई : ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टीलगत वाकोला नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने नदीत तरंगणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. नदीत जाणारा कचरा रोखण्यासाठी आता नदीच्या संरक्षण भिंतीवर सुमारे १० फूट उंचीची जाळी बसविण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

वाकोला नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरंगणारा कचरा आढळून येत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर २३ जुलै २०२५ रोजी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीलगतच्या वाकोला नदीच्या संरक्षण भिंतीवर जाळी बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कचऱ्याचे प्रमाण घटले

नदीच्या भिंतीपासून सुमारे १० फूट उंचीची जाळी उभारण्यात येणार असून त्यामुळे नदीमध्ये कचरा तसेच इतर तरंगणारे पदार्थ टाकण्यास प्रतिबंध होण्याची अपेक्षा आहे. या आधी एच/पश्चिम विभागातील मेन एव्हेन्यू नाला आणि दक्षिण एव्हेन्यू नाला येथे अशाच प्रकारच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या उपाययोजनेमुळे संबंधित नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे पालिकेच्या निदर्शनाला आले आहे.

तरंगता कचराही अडवणार

ज्ञानेश्वर नगरलगत वाकोला नदीमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी जाळी बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून कल्पेश कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २५ टक्के कमी दराने निविदा भरून या कंपनीने काम मिळवले आहे. या जाळीमुळे नदीत थेट कचरा टाकण्यास आळा बसण्याबरोबरच वाहून येणारा तरंगता कचरा अडवण्यासही मदत होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाढता वाढे बाप्पाची उंची; भुलेश्वर दुर्घटनेनंतर उंच मूर्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत १०० हून अधिक उंच मूर्ती; साकीनाक्यात ४२ फुटी सर्वाधिक उंच मूर्ती

Nepal Floods : नेपाळच्या जलविद्युत बोगद्यांत ५३७ जण अडकले; बोगद्यांमधील बचावकार्याला वेग, भारत, चीन, कोरियाकडून मदत

दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका

पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान

Nepal Floods : नेपाळमधून महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुटका