Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी आणि पाण्याच्या संभाव्य गैरव्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांतील ३१ टँकर भरणा केंद्रांवर आता आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) आधारित इनलाइन अल्ट्रासॉनिक जलमापके बसविण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी आणि पाण्याच्या संभाव्य गैरव्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांतील ३१ टँकर भरणा केंद्रांवर आता आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) आधारित इनलाइन अल्ट्रासॉनिक जलमापके बसविण्यात येणार आहेत. या यंत्रणेमुळे टँकरमध्ये किती पाणी भरले गेले, किती टँकरनी पाणी उचलले आणि एकूण किती पाणी वितरित झाले याची माहिती प्रत्येक १५ मिनिटांनी थेट महापालिकेच्या ‘एक्वा सर्व्हर’वर उपलब्ध होणार आहे.

महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवर यापूर्वी २०१९ मध्ये तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांच्या निर्देशानुसार ८० मिमी आणि १०० मिमी क्षमतेची एकूण ६४ यांत्रिक जलमापके बसविण्यात आली होती. या जलमापकांद्वारे वितरित होणाऱ्या पाण्याची नोंद स्थानिक स्तरावर रजिस्टरमध्ये केली जात होती. मात्र, या यंत्रणेत केंद्रीकृत आणि ऑनलाइन माहिती संकलनाची सुविधा नसल्याने नियोजन व नियंत्रण विभागाला प्रत्यक्ष वेळेतील आकडेवारी उपलब्ध होत नव्हती.

अल्ट्रासॉनिक जलमापकांचा पर्याय

यंदाच्या उन्हाळ्यात जलसाठ्यात घट झाल्याने मुंबईत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. फेब्रुवारी ते मे २०२६ या कालावधीत टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला. अशा परिस्थितीत टँकर भरणा केंद्रांमधून किती पाणी वितरित होत आहे, याची अचूक आणि तात्काळ माहिती उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थापनावर मर्यादा येत होत्या.

याच पार्श्वभूमीवर जल अभियंता विभागाने आधुनिक आयओटी आधारित अल्ट्रासॉनिक जलमापकांचा पर्याय स्वीकारला आहे.

तफावत तात्काळ लक्षात येणार

या नव्या जलमापकांद्वारे प्रत्येक १५ मिनिटांनी पाणी वितरणाची माहिती थेट एक्वा सर्व्हरवर पाठवली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियोजन व नियंत्रण विभागाला टँकर पाणीपुरवठ्याचे सातत्याने निरीक्षण करता येणार असून वितरणातील अनियमितता, पाण्याची चोरी किंवा नोंदीतील तफावत तत्काळ लक्षात येणार आहे.

प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणार

महापालिकेच्या या निर्णयामुळे टँकर पाणीपुरवठा व्यवस्थेवर डिजिटल नियंत्रण प्रस्थापित होणार असून पाण्याच्या वितरणातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. विशेषतः पाणीटंचाईच्या काळात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवणे शक्य होणार असल्याने पाणीचोरी आणि गैरव्यवहारांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी मुंबई महापालिका १ कोटी ३३ लाख १० रुपये खर्च करणार असून बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

पाण्याच्या प्रत्येक लिटरची अचूक नोंद

पाणीटंचाईच्या काळात टँकर भरणा केंद्रांवर एकाच वेळी मोठ्या संख्येने टँकर येत असल्याने उच्च दाब आणि वेगवान प्रवाह निर्माण होतो. अशा वेळी पारंपरिक यांत्रिक जलमापकांच्या मोजमाप क्षमतेवर परिणाम होऊन नोंदी अचूक राहत नाहीत. उलट अल्ट्रासॉनिक जलमापकांमध्ये कोणतेही यांत्रिक भाग नसल्याने ते उच्च दाब आणि मोठ्या प्रवाहातही अधिक अचूक मोजमाप करतात. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक लिटरची अचूक नोंद ठेवणे शक्य होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

पुण्यात दोन CA विरोधात गुन्हा; 'शेल'च्या माध्यमातून ४,४२७ कोटींची करचुकवेगिरी

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

IND W Vs SL W Asian Games Final: भारताची सुवर्णपदकासाठी आज श्रीलंकेशी लढत