मुंबई : विजया बँकेच्या माजी सहाय्यक महाव्यवस्थापक आणि कंपनी संचालकाला सीबीआय न्यायालयाने २००८ मधील २६ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले. १२ वर्षे खटला चालल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. याचवेळी दोषींना उच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याची संधी देत न्यायालयाने शिक्षेला महिन्याची स्थगिती दिली.
रोशन इलेक्ट्रिकल कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक अनिता मथियास यांना तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी ही रक्कम वैयक्तिक मिळवली होती. तसेच विजया बँकेच्या गोरेगाव शाखेचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक के. श्रीधर शेट्टी यांना एक वर्षाचा साधा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश अमित खारकर यांनी दोन्ही आरोपींनी दोषी ठरवून शिक्षा सुनावली. हा फसवणुकीचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्याचा बँकिंग क्षेत्रावर परिणाम होतो. त्यामुळे अशा गुन्ह्यातील आरोपींना कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे. अनिता मथियासने शेट्टीसोबत कट रचून बँकेच्या निधीचा गैरवापर केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून स्पष्ट झाले. न्यायालयाने बचाव पक्षाच्या विनंतीवरून दोन्ही शिक्षांना एक महिन्यासाठी स्थगिती दिली, कारण दोषींना उच्च न्यायालयात अपील दाखल करता येईल.