ChatGPT वापरून बनवला लोकल ट्रेनचा बनावट पास; भन्नाट आयडिया तरुणाच्या अंगलट 
मुंबई

Mumbai : ChatGPT वापरून बनवला लोकल ट्रेनचा बनावट पास; भन्नाट आयडिया तरुणाच्या अंगलट

मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकात ChatGPT वापरून बनावट रेल्वे पास तयार केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. मुंब्रा ते CSMT प्रवासासाठी वापरलेल्या या पास वापरणाऱ्या तरुणावर...

किशोरी घायवट-उबाळे

एआय (AI) च्या मदतीने सध्या कोण काय करेल याचा काही नेम नाही. त्यात एआयच्या वापराने फसवणुकीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच एक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. भायखळा रेल्वे स्थानकात तंत्रज्ञानाचा गैरवापर करत चॅटजिपीटी (ChatGPT) च्या मदतीने बनावट रेल्वे पास तयार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिकीट तपासणीदरम्यान बनावट पासचा हा प्रकार गुरुवारी (दि.२५) उघड झाला. या प्रकरणामुळे डिजिटल फसवणूकीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

भायखळा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ तिकीट तपासनीस कुणाल सावरडेकर नियमित तपासणी करत होते. त्यावेळी त्यांनी आदिल अन्सार खान या प्रवाशाला तिकीट दाखवायला सांगितले. त्यावेळी खानने आपल्या iPhone 13 Pro वर रेल्वे पासचा फोटो दाखवला.

UTS अ‍ॅपवर पास नसल्याने संशय

हा पास अधिकृत UTS मोबाइल अ‍ॅपवर नसल्याचे लक्षात येताच तिकीट तपासनीसांना संशय आला. त्यानंतर खानला पुढील पडताळणीसाठी तिकीट तपासणी कार्यालयात नेण्यात आले.

ChatGPT वापरून बनावट पास

तपासात समोर आले की, मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या आदिल खानने मित्राच्या मदतीने ChatGPT चा वापर करून हा बनावट एक महिन्याचा रेल्वे पास तयार केला होता.

बनावट पास वापरून अनेकदा प्रवास

या पासवर २४ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर असा कालावधी नमूद असून, मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या मार्गासाठी २१५ रुपये भाडे दाखवण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, खानने या कालावधीत हा बनावट पास वापरून अनेकदा प्रवास केला.

गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू

या प्रकरणी तिकीट तपासनीस कुणाल सावरडेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सीएसएमटी (CSMT) रेल्वे पोलिसांनी आदिल खानविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३१८ (२) – फसवणूक, कलम ३३६ (३) – बनावट दस्तऐवज तयार करणे, कलम ३४० (२) – बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदी वापरणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, आरोपीने नेमके किती दिवस आणि किती वेळा बनावट पासवर प्रवास केला, याचा सखोल तपास सध्या रेल्वे पोलीस करत आहेत.

लिबर्टी शोरूमने तुटलेल्या चप्पलीची वॉरंटी नाकारली; वाद थेट कोर्टात, मॅनेजरला होणार अटक

Google Update : जुना ईमेल आयडी बदलायचाय? आता गुगल देणार नवा पर्याय; जाणून घ्या नियम

रानडुक्कराचा वन विभागाच्या पथकावर हल्ला; अधिकारी गंभीर जखमी; Video व्हायरल

'तो स्पष्ट नाराज दिसतोय!'; एपी ढिल्लोंने ताराला Kiss केल्यानंतर वीर पहारियाची प्रतिक्रिया व्हायरल | Video

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...