छायाचित्र : विजय गोहिल
मुंबई

छायाचित्रकारांनी मांडला हवामान बदलाचा आसाम ते केनिया प्रवास; चर्चासत्रात झिशान लतीफ, दिलीप शाह यांचे विचारमंथन

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीकाठी नदीची धूप सहन करत जगणारे समुदाय आणि केनियाच्या ‘मसाई मारा’ परिसरात बदललेल्या मार्गाने व वेळीच स्थलांतर करणारे वन्यजीव, या बदलत्या हवामानाच्या वास्तवावर शुक्रवारी मुंबईत एका चर्चासत्रात प्रकाश टाकण्यात आला.

प्रतिनिधी

एफपीजे न्यूज सर्व्हिस

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीकाठी नदीची धूप सहन करत जगणारे समुदाय आणि केनियाच्या ‘मसाई मारा’ परिसरात बदललेल्या मार्गाने व वेळीच स्थलांतर करणारे वन्यजीव, या बदलत्या हवामानाच्या वास्तवावर शुक्रवारी मुंबईत एका चर्चासत्रात प्रकाश टाकण्यात आला. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे वारंवार गेल्याने हवामान बदलाचे नेमके कोणते परिणाम दिसून येतात, याचे अनुभव छायाचित्रकार झिशान लतीफ आणि वन्यजीव छायाचित्रकार दिलीप शाह यांनी यावेळी मांडले.

फ्री प्रेस हाऊसमधील ‘गॅलरी एफपीएच’ येथे ‘वर्ल्ड प्रेस फोटो’च्या ‘डाऊन टू अर्थ : क्लायमेट चेंज अँड क्लायमेट फ्युचर्स’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले. छायाचित्रण हे हवामान बदलाचे साक्षीदार ठरू शकते का, असा प्रश्न खानोलकर यांनी उपस्थित केला. एकाच भेटीत सहसा न दिसणारे सूक्ष्म बदल अनेक वर्षे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा गेल्याने स्पष्टपणे समोर येतात, असे मान्यवर म्हणाले.

ओळख गमावण्याची भीती

आपण २०१५ मध्ये आसाममध्ये नदीची धूप झाल्यामुळे संकटात सापडलेल्या एका बेटाचे डॉक्युमेंटेशन करण्यास सुरुवात केल्याचे लतीफ यांनी सांगितले. तेथील रहिवाशांसाठी ते बेट वाचवणे म्हणजे त्यांची जीवनशैली वाचवणे यावर ठाम होते, असे त्यांनी नमूद केले. नदीकाठच्या कुटुंबांसोबत वेळ घालवण्याचे आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. वैज्ञानिक मोजमापांतून जी आकडेवारी समोर येते, तिला या लोकांच्या अनुभवांमुळे एक मानवी चेहरा मिळतो, असे लतीफ यांनी स्पष्ट केले. नदीकाठी जमीन नष्ट होणे म्हणजे केवळ घर गमावणे नव्हे, तर पिढ्यान् पिढ्या आपले मानलेले, त्यांची ओळख असलेले ठिकाण गमावण्याची भीती लोकांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

स्थलांतराचा परिणाम अन्नावर होतो

मसाई मारा येथे डझनभराहून अधिक वेळा भेट दिलेल्या शाह यांनी वन्यजीवांच्या स्थलांतराच्या वेळा आणि मार्गांमध्ये झालेल्या बदलांचे वर्णन केले. पाऊस आणि गवताची उपलब्धता व दर्जा यावर प्राण्यांचा प्रवास अवलंबून असतो, असे त्यांनी सांगितले. स्थलांतराच्या वेळेतील या बदलांचा परिणाम पिल्लांच्या जन्मावेळी उपलब्ध होणाऱ्या अन्नावर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

संवर्धनामध्ये उपजीविकेचा विचार महत्त्वाचा

ज्या ठिकाणांचे डॉक्युमेंटेशन केले जाते, तेथील निर्णयांमध्ये स्थानिक समुदायांना सहभागी करून घेण्यावर दोन्ही छायाचित्रकारांनी भर दिला. आपण ज्या लोकांसोबत काम करतो, त्यांच्याकडे असलेले ज्ञान कोणत्याही उपाययोजनेसाठी मार्गदर्शक ठरले पाहिजे, असे लतीफ म्हणाले. संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये स्थानिकांच्या उपजीविकेचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शाह यांनी अधोरेखित केले.

लोकांच्या दबावाची दखल घ्यावीच लागते

एखाद्या छायाचित्राने लक्ष वेधून घेतल्यानंतर पुढे काय होते आणि त्यातून निर्माण होणारी भावनिक प्रतिक्रिया कृतीत रूपांतरित होऊ शकते का, असा सवालही खानोलकर यांनी केला. छायाचित्राचे दृश्य आकर्षण प्रेक्षकाला त्या कथेशी जोडून घेऊ शकते, मात्र केवळ एका छायाचित्रातून काय साध्य होईल याबद्दल लतीफ यांनी सावध मत व्यक्त केले. त्यांच्या मते, सातत्यपूर्ण दृश्य कामातून असा लोकांचा दबाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे धोरणकर्त्यांना याची दखल घ्यावी लागते. एकाच ठिकाणाचे काळानुसार छायाचित्रण करण्याचे महत्त्व शाह यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. एका भेटीत हे बदल अत्यंत सूक्ष्म वाटू शकतात, परंतु जेव्हा ही सर्व छायाचित्रे एकत्र पाहिली जातात, तेव्हा हे बदल अधिक सहजपणे ओळखता येतात, असे ते म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा